HW News Marathi
मनोरंजन

बालदिनाच्या निमित्ताने मोझॅकच्या माध्यमातून साकारले निरागस रूप 

गौरी टिळेकर | स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती ! पंडित नेहरूंचे लहान मुलांवर अफाट प्रेम होते. म्हणूनच त्यांची जयंती आपण बालदिन म्हणून साजरी करतो. या बालदिनाच्या निमित्तानेच चेतन राऊत यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून चिमुकल्यांना एक अनोखी भेट दिली आहे. चेतन यांनी तब्बल ६००० प्लास्टिकच्या छोट्या रंगीबेरंगी चेंडूंचा वापर करून एका लहान बाळाचे मोझॅक पोट्रेट साकारले आहे. विशेष म्हणजे या मोझॅक पोट्रेटच्या माध्यमातून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये चेतन राऊत यांच्या सहाव्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.

चेतन राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून तयार केलेले हे मोझॅक प्लास्टिकच्या चेंडूचा वापर करून तयार केलेले जगातील सर्वात मोठे मोझॅक पोट्रेट आहे. हे पोट्रेट साकारण्यासाठी १२ तासांचा अवधी लागला आहे. एका आदिवासी पाड्यात जाऊन चेतन यांनी हे मोझॅक तयार केले आहे. आदिवासी पाड्यातील चिमुकल्यांसोबत हा बालदिन साजरा करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केल्याचे चेतन यांनी म्हटले आहे. या मुलांना कलेची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना कलेच्या आणखी जवळ न्यावे यासाठी चेतन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मुलांना वारली पेंटिंगचे धडे दिले.

यावेळी चेतन यांनी आदिवासीपाड्यांमधील अपुऱ्या सोयी-सुविधांचा देखील उल्लेख केला. “मी माझ्यापरीने या चिमुकल्यांचा बालदिन उत्तमरित्या साजरा व्हावा आणि त्यांना आनंद मिळावा यासाठी प्रयत्न केले. हे मोझॅक पाहिल्यानंतर चिमुकल्यांनी दिलेल्या गोड प्रतिक्रियेमुळे माझा उद्देश साध्य झाला आहे”, अशी भावना चेतन यांनी व्यक्त केली. “यापुढेही मी या चिमुकल्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणार आहे. या मुलांचे शिक्षण आणि त्यांनी त्यांच्या आवडत्या क्षेत्रात पुढे जावे यासाठी मी त्यांना कायमच सहकार्य करेन”, असे यावेळी चेतन म्हणाले.

योगायोग म्हणजे दोन वर्षांपूर्वी बालदिनादिवशीच चेतन यांनी त्यांच्या पहिल्या विश्वविक्रमाची नोंद केली होती. आज याच दिवशी त्यांनी आपल्या सहाव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. चेतन त्यांच्या प्रत्येक मोझॅक आर्टमध्ये पूर्वी कधीही वापर न झालेल्या वस्तूंचा समावेश करतात. यावेळी त्यांनी प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी चेंडूंचा वापर केला आहे. चिमुकल्यांना चेंडूंचे आकर्षण असते. त्यामुळे हे मोझॅक पोट्रेट इतरांपेक्षा लहान मुलांना अधिक जवळचे वाटावे हा चेतन यांचा उद्देश होता.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढच्या वर्षी लवकर या! बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात

News Desk

‘मन्नत’ मध्ये दहीहंडी फोडल्या प्रकरणी शाहरुखविरुद्ध फतवा

News Desk

सिनेतारका मीनाकुमारीही होती तिहेरी तलाकची बळी!

News Desk