तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीनेवर बलात्कार

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीनेवर बलात्कार

नवी मुंबई : मैत्रिणीसोबत वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ओळखीतील तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे घडली. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेली ही मुलगी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कोपरखैरणे पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्धबलात्कार तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या मुलीला फूस लावून नेणाऱ्या तिच्या शेजारच्या तरुणीलाही या गुह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.

या घटनेतील १६ वर्षीय पीडित शाळकरी मुलगी कोपरखैरणे येथील असून ती नववीमध्ये शिकते. ८ जुलैला या मुलीला शेजारच्या २२ वर्षीय मैत्रिणीने वाढदिवसानिमित्त सोबत नेले होते. मात्र तीन दिवस उलटूनही ती घरी न परतल्याने तिच्या आईने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती. ही मुलगी यापूर्वीही चार वेळा अशाच पद्धतीने तीन-चार दिवसांसाठी घरातून निघून गेली होती.

तीन दिवसानंतर ही मुलगी घरी परतल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. शेजारील तरुणीने आपल्याला फूस लावून उरण येथे नेल्याचे तसेच तेथे गेल्यानंतर एका तरुणाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने आईला सांगितले. त्यामुळे या मुलीच्या आईने शुक्रवारी दुपारी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केली.


Next Story
Share it
Top
To Top