त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांची मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धडक

त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांची मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धडक

न्याय मागणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण करणारे सरकार जनरल डायर वृत्तीचे-धनंजय मुंडे

मुंबई न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्यास आलेल्या शेतकऱ्याला मंत्रालयात पोलीस अधिकाऱ्यांकडुन झालेल्या गंभीर मारहाणीची आज राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांनी गंभीर दखल घेत शेतकऱ्याच्या मदतीसाठी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशन गाठुन पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला. सरकार कोणाचेही असो पण शेतकऱ्यांना मारहाण करण्याची ही कुठली पध्दत असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.अजितदादा पवार यांनी उपस्थित केला तर शेतकऱ्यांना मारहाण करण्याची सरकारची ही कृती म्हणजे सरकारची जनरल डायरची वृत्तीच असल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केला.

दोन वर्षापुर्वी झालेल्या गारपीटीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील घाटशेंद्रा गावातील हरिभाऊ भुसारे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. दोन वर्ष पाठपुरावा करुनही मदत न मिळाल्यामुळे काल तो मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आला असता तेथील सुरक्षा रक्षकांनी व त्यानंतर पोलीसांनी त्यास बेदम मारहाण केल्याणे तो गंभीर जखमी झाला होता. असे असतांना मरिन ड्राईव्ह पोलीसांनी त्यालाच अटक करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर बाबीची दखल घेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, ना.धनंजय मुंडे, आ.जयंत पाटील, आ.शरद रणपिसे, आ.जितेंद्र आव्हाड, आ.मधुसुदन केंद्रे, आ.विजय भांबळे, आ.सुनिल केदार, आ.निरंजन डावखरे, आ.प्रकाश गजभिये यांच्यासह पंधरा ते वीस आमदारांनी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशन गाठुन पोलीसांना जाब विचारला.

खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तसेच खोटी माहिती देणाऱ्या पोलीसांनाही उघडे पाडले, जखमी शेतकऱ्याची भेट घेवुन त्याला दिलासा देत त्याच्याकडुन झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. ऐवढेच नव्हे तर त्या शेतकऱ्याची ही फिर्याद घेण्यासाठी पोलीस ठाण्यातच ठाण मांडले. पोलीसांनी घेतलेली भुमिका यामुळे ही नेते मंडळी चांगलरीच संतप्त झाली होती. शेतकऱ्यांशी वागणुकीची ही कोणती पध्दत असा सवाल अजितदादांनी उपस्थित केला तर शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्याचा चंग बांधलेले सरकार सभागृहात आम्हाला बोलु देत नाही आणि सभागृहा बाहेर शेतकऱ्यांना मारहाण करणे अशी टिका धनंजय मुंडे यांनी केली.

दरम्यान सदर शेतकऱ्या विरुध्द दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, शेतकऱ्यास मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी व सुरक्षा रक्षकांवरही गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


Next Story
Share it
Top
To Top