मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यादोघांच्याही हत्या पूर्वनियोजित होत्या, हे आतापर्यंत पुढे आलेल्या माहितीतून स्पष्ट होते, असे निरीक्षण बुधवारी उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच याहत्यांमागील आर्थिक दुव्यांचा तपास का केला नाही,असा सवाल तपास यंत्रणांना केला.
पानसरे आणि दाभोलकर कुटुंबियांनी तपास यंत्रणेतर्फे केल्या जाणाऱ्या तपासाबाबत असमाधान व्यक्त करत न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात केली आहे. बुधवारी याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळेस आतापर्यंतच्या तपासातून या दोन्ही हत्या पूर्वनियोजित आणि त्यांना कुण्या एका संघटनेचे आर्थिक पाठबळ होते हे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने म्हटले. एवढा काळ लपून राहणे ही कुठल्याही आरोपीसाठी व्यक्तिगत पातळीवर अशक्यप्राय बाब आहे. कुठली तरी संघटना त्यांच्या पाठिशी आहे आणि त्यांना आर्थिक साहाय्य करत आहे, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा अनुक्रमे सीबीआय आणि राज्याच्या विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) करणाऱ्या यंत्रणांनी तपासाचा प्रगती अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.