[embed]https://youtu.be/73Pgk2ocRcA[/embed]
गौतम वाघ
उल्हासनगर : दोन सख्ख्या बहिणींच्या असाह्यतेचा फायदा घेत एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी नराधमाला गजाआड केले असून जावेद शेख असे त्याचे नाव आहे.
भांडूप परिसरात एक ३२ वर्षीय महिला पतीसह राहते. उदरनिर्वाहासाठी ती उल्हासनगरमधील एका उच्चभ्रू कुटुंबाकडे घरकाम करते. त्याच कुटुंबाकडे घरगडी म्हणून जावेद कामाला आहे. जावेदने ५ महिन्यापूर्वी विवाहित महिलेला उल्हासनगर परिसरातील आशेळेपाडा येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घर दाखवण्याच्या बहाण्याने नेले. तेथे तिच्या असाह्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कोणाला सांगितली तर समाजात तुझी बदनामी करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा एका लॉजवर नेऊन तिथेही तिच्यावर बलात्कार केला. पीडित विवाहितेला वेळोवेळी ब्लॅकमेल करून तिच्याकडून रोख रक्कम उकळली. काही दिवसांनी पीडित विवाहितेच्या कांजुरमार्गाला राहणाऱ्या २५ वर्षीय लहान बहिणीला नराधम जावेदने काम लावण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला २६ जून रोजी उल्हासनगर परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावरही बलात्कार केला. तो एवढ्यावर थांबला नाही. त्याने बलात्कार करते वेळी मोबाईलवर अश्लील फोटो काढले. त्यानंतर त्या पीडित तरुणीलाही अश्लील फोटो दाखवून तिच्याकडे रोख रक्कमेची मागणी केली.
अखेर या नराधमाच्या जाचाला कंटाळून या दोघी सख्ख्या बहिणींनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघींवर घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी काही तासातच नराधम जावेदच्या मुसक्या आवळल्या. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चौधरी करत आहेत.