पोलिस बंदोबस्तात अॅड. निकम यांचे मोबाईल चोरीला

पोलिस बंदोबस्तात अॅड. निकम यांचे मोबाईल चोरीला

जळगाव : -मुंबई येथून जळगावला येत असताना पठाणकोट एक्सप्रेसच्या ए-वन या वातानुकुलीत बोगीतून राज्याचे विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांचे दीड लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. अॅड. निकम यांना झेड प्लस सुरक्षा आहे. ही सुरक्षा भेदून चोरटय़ांनी हे मोबाईल लंपास केले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे अॅड.निकम यांच्या सुरक्षेचे वाभाडे निघाले आहेत.

दादर-अमृतसर एक्सप्रेस या पठाणकोट एक्सप्रेसच्या ए-वन या वातानुकुलित बोगीत 38 क्रमाकांचे सीट त्यांचे आरक्षित होते. शनिवारी रात्री ते दादर येथून जळगाव येण्यासाठी या एक्सप्रेसमध्ये बसले. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईचा सुरक्षा ताफा होता. कल्याण स्टेशन सोडल्यानंतर अॅड.निकम हे आपल्या सीटवर झोपले. पहाटे सहा वाजेच्या सुमारास पाचोरा स्टेशन आल्यावर जाग आली असता अॅपल कंपनीचा 90 हजार रुपये किमतीचा एक व दुसरा 60 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरी झाल्याचे निकम यांच्या लक्षात आले.

रात्री बंदोबस्ताला असलेले झेडप्लस सुरक्षेतील सुरक्षा ताफ्यातील रक्षकांचेही डोळे लागले होते. पुढे मनमाड येथून सुरक्षा रक्षकांचा ताफा बदलला, नंतर तेही झोपले होते. त्यामुळे दोन्ही मोबाईल हे कल्याण ते मनमाड दरम्यान चोरीस गेले की मनमाड ते पाचोरा दरम्यान हे स्पष्ट होवू शकले नाही. सकाळी साडे सहा वाजता जळगाव स्थानकावर उतरल्यावर अॅड.निकम यांनी लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली.


Next Story
Share it
Top
To Top