नायगाव (ता. औरंगाबाद) येथील सय्यद रहेमान सय्यद रुस्तुम हा २६ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी मित्र सय्यद कलीमसोबत बैल घेऊन औरंगाबादला पायी जाणार होता. मात्र, पत्नीनजमाबीने आपण अगोदर विहिरीवरुन पाणी आणू. त्यानंतर तुम्ही जा अशी गळ घातली. पती-पत्नी दोघेही पाणी आणण्यासाठी गावातील विहिरीजवळ गेले. तेव्हा रहेमान आला नाही म्हणून त्याचा मित्र कलीम त्याच्या घरी गेला. तेव्हा मुलगी आस्माने पप्पा आणि मम्मी विहिरीवर पाणी आणायला गेल्याचे सांगितले. कलीम विहिरीकडे निघाला.
विहिरीजवळ पाणी भरताना पती-पत्नीमध्ये संवाद सुरू असताना विनोद रंगनाथ पवार (रा. सांवगी) हा पाठीमागून आला आणि त्याने डोक्यात जोरात फावड्याचा दांडा मारून त्याचा खून केला. ही घटना कलीमने प्रत्यक्ष पाहिली होती. सत्र न्यायालयाने त्याची साक्ष ग्राह्य धरीत आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.