नागपूर प्रेम प्रकरणाला विरोध करणाऱ्या आई-वडिलांना जेवणात किटकनाशक घालून ठार मारण्याचा प्रयत्न एका युवतीने केल्याचा प्रकार नागपूरमधील न्यू डायमंडनगर परिसरात उघडकीस आला. सध्या मुलीच्या आई वडिलांची प्रकृती धोक्याबाहेर असून पोलिसांनी युवती व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
दहावी शिकलेल्या एका युवकाचे बारावीत शिकत असलेल्या युवतीसोबत काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. जानेवारी महिन्यात दोघेही पळून गेले होते. या प्रकरणी तरुणावर कोतवाली पोलिस ठाण्यात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
युवतीच्या आई-वडिलांचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. या विरोधाला कंटाळल्याने त्या युवतीने शुक्रवारी रात्री जेवणात उंदीर मारण्याच्या गोळ्या मिसळल्या. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नाही. युवतीने आपल्या प्रियकराला फोन करून बोलावून घेतले. त्याने झोपेत असलेल्या तिच्या आई-वडिलांना मारहाण करून त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यात तो अपयशी ठरला, शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तिने या बाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.