जळगाव । जिल्ह्यातील चोपडा शहराजवळील शेत शिवारात वीज खांबावरील केबल चोरत असताना आरोपींना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका संशयितांचा मृत्यू झाला असून त्याचा एक साथीदार जखमी झाला आहे. शहरातील रामपुरा भागाजवळील शेत शिवारात गुरुवारी रात्री १ वाजेच्या सुमारास मयत सुभाष बारेला (वय ४५, रा.हसली बोरखेडा ता.शिरपूर जि.धुळे) व त्याचे चार साथीदार वीज खांबावरील अॅल्युमिनिअम वायर चोरत असतांना आढळले. दरम्यान शिवारात रात्री पिकांना पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यांनी या चोरांना रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला. त्यामुळे मयत सुभाष बारेला व फिर्यादी नाना बारेला (रा.सेंधवा जि.बडवानी) हे दोघे जबर जखमी झाले. शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याला आरोपींना पकडून आणले. दोघा जखमींना उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचार सुरु असतांना रात्री २ वाजेच्या सुमारास सुभाषचा मृत्यू झाला. या मृत्यूस जबाबदार म्हणून चोपडा शहर पोलीस ठाण्यात आरोपी विजय पाटील (२७), मंगल माळी (४५), भाईदास भिलाला (५८), महेश पारधी (अल्पवयीन) (सर्व रा.चोपडा ) यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
Top of Form