माथेरानमध्ये पोलिसांकडूनच वाहन बंदीचे उल्लंघन, स्थानिकांकडून कारवाईची मागणी

माथेरानमध्ये पोलिसांकडूनच वाहन बंदीचे उल्लंघन, स्थानिकांकडून कारवाईची मागणी

मुंबई – कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच कायद्याचे उल्लंघन झाल्याचा धक्कादायक प्रकार माथेरानमध्ये उघडकीस आला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने माथेरानमध्ये वाहने वापरण्यास बंदी आहे. मात्र पोलिसांनी या वाहन बंदीचे उल्लंघन केल्याचा प्रकार रविवारी समोर आला.

एका बलात्कार प्रकरणाचा तपासासाठी पोलीस खासगी गाडी घेऊन थेट माथेरानमध्ये घुसले. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्यांवर आता नियम मोडल्याबद्दल कोण कारवाई करणार, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. कल्याणमधील एका बलात्कार प्रकरणातील गुन्हेगाराच्या तपासासाठी पोलिसांचे एक पथक माथेरानमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी खासगी ट्रॅव्हल्सची इनोव्हा गाडी सोबत आणली होती. पर्यावरणाच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या निर्बंधानुसार ही गाडी दस्तुरी नाका येथे ठेवणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांचे पथक गाडी घेऊन थेट माथेरानमध्ये दाखल झाले. माथेरानमध्ये दाखल झालेली गाडी स्थानिकांनी बाजारपेठ परिसरात अडवली. यानंतर इनोव्हा गाडी माथेरान येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आली. पोलिसांनी मोडलेल्या नियमांमुळे माथेरानमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कायदा सर्वांना समान आल्याने नियमानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

माथेरानच्या स्थापनेपासून इथे वाहन वापरावर बंदी आहे. फेब्रुवारी २००३ मध्ये माथेरानला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर येथे पर्यावरण संवर्धनासाठी काही नियम ठरवून दिले गेले. यामध्ये वाहन वापरावरील बंदीचा समावेश होता. रुग्णवाहिकेचा अपवाद वगळता येथे कोणतेही वाहन वापरता येत नाही. त्यामुळे माथेरानमध्ये येणारी वाहने दस्तुरी नाक्यावर थांबवली जातात. तिथून पायी चालत, घोड्यांचा वापर करत माथेरान गाठावे लागते. मात्र असे असूनही पोलिसांनी इनोव्हा गाडी थेट बाजारपेठेत आणल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरु असून नियमानुसार संबधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक आचरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.


Next Story
Share it
Top
To Top