मुंबईच्या प्रवाशाला महामार्गावर मारहाण करत लुटले

पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुणेः पुणे-मुंबईः द्रुतगती महामार्गावर मुंबईतील एका प्रवाशाला बेदम मारहाण करून त्याच्याकडील ऐवज लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उघडा. पंकज सुनील कदम (वय २७, रा. मालाड, मुंबई) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. गाडीतील व्यक्तींनी पंकज यांना धारदार शस्त्रे, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या चोरट्यांनी पंकज यांच्याकडून रोख १५०० रूपये आणि मोबाइल चोरून नेला.

वाकड- हिंजवडी पुलाखाली खासगी वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीत पंकज कदम हे मुंबईकडे जाण्यासाठी बसले होते. मात्र, या गाडीतील चालकासह चार व्यक्तिंनी पंकज यांना धारदार शस्त्राने, लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम १५०० रुपये आणि मोबाइल काढून घेतला. त्यानंतर त्यांना पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील किवळे येथे सोडून दिले. जखमी अवस्थेत काही नागरिकांनी पंकज याना खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर खासगी वाहतूक करणारी काळ्या रंगाची ही स्कॉर्पिओ मुंबईकडे गेली. सध्या देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल असून तो हिंजवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पुणे- मुंबई महामार्गावर खासगी वाहनातून प्रवास करणा-या हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. नफा कमावण्याच्या स्पर्धा आणि त्यात येणारे अपयश यातून खासगी वाहनांतील काही भामट्यांनी हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top