मुंबई : मायबहिणींच्या अब्रुचे रक्षण करण्याचे व्रत शिवछत्रपतींनी समाधीस्थ झाल्यानंतर तीन – साडेतीनशे वर्षांनंतरही अखंड सुरू ठेवले आहे. मुंबईत तरुणीची छेड काढून पळालेल्या रोडरोमिओंच्या मुसक्या आवळण्यात शिवछत्रपतींनी पोलिसांना सहकार्य केले आहे.
त्याचे झाले असे की, वांद्रे परिसरात राहणारी १७ वर्षीय तरुणी ज्ञानेश्वर नगर येथे रस्त्यातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या उमेश चव्हाण (२४) आणि सुनील राठोड (१९) यांनी भररस्त्यात तिचा छेड काढला. तरुणीने खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासले. आरोपी उभे असलेल्या ठिकाणी कुरिअर कंपनीचे ऑफिस असून कंपनीतील दोघांशी ते बोलत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले. पोलिसांनी कुरिअर कंपनीतील आठ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली, मात्र काहीच हाती लागले नाही. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दोघांच्या दुचाकीवरील नंबरप्लेटशेजारी रेडियममध्ये शिवाजी महाराजांचे चित्र स्पष्ट दिसत होते. त्याआधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोहन कदम यांच्या पथकाने एका आरोपीला वांद्रेतून तर दुसऱ्याला वाकोल्यातून शिताफीने अटक केली. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी तब्बल ४० जणांची कसून चौकशी केली होती.