अकोला : महिलेची विनयभंगाची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशांनुसार मंगळवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.डाबकी रोड पोलिस स्टेशन येथील तत्कालीन महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी शंकरराव गायकवाड हिच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.
डाबकी रोड पोलिस स्टेशनला खडकी टाकळी येथील ४५ वर्षीय महिला १७ मार्च रोजी देवराव भारत मेश्राम, महेंद्र देवीदास डोंगरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार देण्यास आल्या. परंतु, त्या वेळी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक माधुरी शंकरराव गायकवाड (सध्याची नेमणूक वर्धा) हिने त्यांची तक्रार नोंदविली नाही. तसेच अदखलपत्राचाही गुन्हा नोंदविण्यास टाळले. त्यामुळे पीडित महिलेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आठवे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी २३ ऑगस्टला आदेश दिले. त्यानुसार देवराव मेश्राम व महेंद्र डोंगरे या दोघांविरोधात विनयभंगाचा व धमकी देणे, मारहाण करणे आदी गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले. तसेच कर्तव्यात कसूर केल्यावरून ठाणेदारांना पोलिस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड हिच्याविरोधातही गुन्हा नोंदविण्याचे आदेश बजाविले.