नवी दिल्ली - चोराने बॅग खेचण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या झटापटीत ट्रेनमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकावर घडली.
पीडित महिला सुधीर बंसल आपला मुलगा गौरवसबोत ट्रेनने प्रवास करत होत्या. गौरवला दिल्ली विद्यापिठात प्रवेश मिळाला होता. त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने आई आणि मुलगा दिल्लीत फिरत होते. त्यांनी राजस्थानहून योगा एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास सुरु केला होता. सुधीर बंसल प्रवासावेळी दरवाजाजवळ उभ्या होत्या. मिठाई पुलावर पोहोचल्यानंतर ट्रेनचा वेग कमी झाला होता, नेमकी हीच संधी साधत चोराने सुधीर बंसल यांची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुधीर यांनी चोराशी झटापट केली, आणि त्या ट्रेनमधून खाली पडल्या. ट्रॅकवर पडल्यानंतर रेल्वेच्या चाकाखाली आल्याने त्या जखमी झाल्या. गौरवने आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला अपयश आलं. गंभीर जखमी झालेल्या सुधीर बंसल यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. चोर मात्र बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. बॅगेत काही कॅश, कागदपत्रं आणि एटीएम कार्ड होते अशी माहिती त्यांची मुलाने दिली आहे.