कुत्र्यांनी तोडले महिलेच्या मृतदेहाचे लचके

लखनऊ – रुग्णालयाचे दुर्लक्ष आणि गलथानपणामुळे कुत्र्यांनी लचके तोडून एका महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न केल्याची संतापजनक आणि हृदय हेलावून टाकणारी घटना येथील लोहिया रुग्णालयात घडली आहे. रविवारी सकाळी महिलेचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात पोहचल्यावर शनिवारी रात्री घडलेला हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, मृतदेहावरील सोन्याचे दागिने गहाळ झाल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चिनहटचे रहिवासी असणाऱ्या विनोद तिवारी यांची पत्नी पुष्पा (४०) यांना शनिवारी पोटात दुखत असल्याने सकाळी साडेनऊ वाजता लोहिया रुग्णालयातदाखल करण्यात आलं. उपचारांदरम्यान शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पुष्पा यांनी विष खाल्ले असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. म्हणूनच पोस्टमार्टेमनंतर पुष्पाच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह दिला जाणार होता. यासाठी पुष्पा यांचा मृतदेह रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला होता.

रविवारी सकाळी पुष्पा यांचं कुटुंबिय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचलं तेव्हा खोलीच्या बाहेर सगळीकडे रक्त पसरलं होतं. खोलीचा दरवाजा उघडून आत गेल्यावर त्यांना पुष्पा यांचा मृतदेह छिन्हविछिन्नअवस्थेत दिसला. चेहऱ्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. तसंच दोन्ही डोळे गायब होते. संपूर्ण खोलीमध्ये कुत्र्यांच्या पायाचे ठसे पाहायला मिळाले. पुष्पा यांच्या गळ्यात सोन्याची चेन, पायात पैजण, नाकात सोन्याची चमकी तसंच कानातलेसुद्धा होते, असा आरोप पुष्पा यांच्या कुटुंबियांनी केला आहे. रविवारी जेव्हा आम्ही मृतदेह घेण्यासाठी गेलो तेव्हा या सगळ्या वस्तू गायब होत्या, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.

पुष्पा यांचा मृतदेह शवगृहात ठेवल्यानंतर शवगृहाला कुलूप लावण्यात आलं होतं. कोणीतरी रात्री दरवाज्याचं कुलूप तोडलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला, असं लोहिया रुग्णालयाचे निर्देशक डॉ.डी.एस.नेगी यांनी सांगितलं. याप्रकरणी वॉर्डबॉय इस्लाम, गार्ड पवन मिक्षा, सुपरवाइजर आशिष आणि अनिल यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. या चौघांविरोधात चोरीची तक्रार देण्यात आली आहे.


Next Story
Share it
Top
To Top