पिंपरी | एका डॉक्टर पतीने पत्नी हुंडा आणत नसल्याने तिच्यापासून घटस्फोट मिळावा यासाठी तिच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. याप्रकरणी पिंपळे सौदागर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांविरोधातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये महिलेचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासरच्या मंडळींनी तिचा हुंड्यासाठी छळ करायला सुरुवात केली. सातत्याने तिच्याकडे पैशाची मागणी करण्यात येत होती. मात्र तरीही पैसे मिळत नसल्याने पतीने महिलेवर घटस्फोटासाठी दबाव टाकला. काही दिवसांपूर्वी ही महिला आजारी पडली होती. याचा फायदा उचलत तिच्या डॉक्टर पतीने तिच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.