कर्नाटक | गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलाने केली असल्याची माहिती संशयित आरोपी अमोल काळे यांनी कर्नाटक एसआयटीला दिल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. या माहितीच्या आधारावरूनच कर्नाटक एसआयटीचे पथक गाडीच्या तपासासाठी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.
कर्नाटक एटीएसच्या माहितीनुसार अमोल काळेने या पिस्तुलाचा 'सुदर्शन चक्र' असे नाव दिले होते. आतापर्यंतच्या तपासातून अमोल काळे हाच पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा प्रमुख सुत्रधार होता, असे आढळल्याची माहिती कर्नाटक एसआयटीतर्फे देण्यात आली आहे. या माहितीमुळे महाराष्ट्र एटीएस, सीबीआय आणि कर्नाटक एसआयटी यांच्या तपासाला वेग आला आहे.
काही दिवसांपूर्वीच सीबीआयने डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलातूनच गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा केला होता. अमोल काळेच्या नव्या खुलास्यामुळे आता या सर्व दिग्गजांच्या हत्येचा आणि आरोपींचा एकमेकांशी असणारा संबंध स्पष्ट होत आहे.