मुंबई | मुंबईतील भुलेश्वर परिसरातील अंगाडीयाच्या कार्यालयात घुसून दरोडा घालणाऱ्या 8 जणांच्या टोळीला एल टी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. हा दरोडा घालणारे तरुण 25 ते 30 वयोगटातील असून पंचतारांकित हॉटेल मध्ये मौजमजा करण्यासाठी आणि घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आरोपीनी दरोडा घातल्याचे कबुल केले आहे.
29 मे 2018 रोजी मुंबईतील भुलेश्वर परिसरात अंगाडीयाचा व्यवसाय करणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 8 जणांनी चाकूचा धाक दाखवत तोंडावर क्लोरोफार्म लावीत दरोडा घातला होता ज्यात तब्बल 1 कोटी 13 लाखांची रोकड लुटण्यात आली होती. ही घटना घडल्यानंतर आरोपीनी मुंबई शहराबाहेर पळ काढला होता. या गुन्ह्याची नोंद एल टी मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असता , आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या पोलीस टिम गुजरात मधील अहमदाबाद ,उत्तर प्रदेश , कनोज , आग्रा सारख्या ठिकाणी पाठविण्यात आल्या होत्या.
पोलिसांनी या संदर्भात अंगाडीयाच्या कार्यालयातील कर्मचारी रिपन पटेल याला ताब्यात घेतले असता त्याने आपण मुख्य सूत्रधार असून गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीच्या तपासातून मिळालेल्या माहितीवरून भाविक पांचाळ , यास अटक केली असता अहमदाबाद येथून फरार होऊन गोव्यात ग्रांट हयात हॉटेल मध्ये लुटलेल्या पैशातून मौजमजा करणाऱ्या संतोष चौहान , जिगर पटेल , नरेंद्र जोउदान , यांना अटक करण्यात आली. आग्रा येथून दिपक भदोरीया तर अहमदाबाद येथून कल्लू शर्मा , आणि पंकज प्रजापती अशा एकूण 8 आरोपीना अटक करून पोलिसांनी 92 लाख रुपये हस्तगत केले आहेत.