मल्ल्याने कर्जाची रक्कम गुंतवली बोगस कंपन्यांत

मल्ल्याने कर्जाची रक्कम गुंतवली बोगस कंपन्यांत

नवी दिल्ली भारतीय बँकांकडून कोट्यवधींचे कर्ज घेऊन फरार झालेल्या विजय मल्ल्याने हा पैसा बोगस कंपन्यांमध्ये गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. मल्ल्याने एसबीआयच्या नेतृत्त्वाखालील बँक समूहाकडून ६ हजार कोटींचे कर्ज घेतले होते. यातील बहुतांश पैसा माल्ल्याने बोगस कंपन्यांकडे वळवल्याची माहिती सीबीआय आणि ‘ईडी’च्या तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे आता सीबीआय आणि ईडीकडून मल्ल्याविरोधात नवे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

विजय मल्ल्याने एसबीआयकडून ६ हजार कोटींचे कर्ज घेतले होते. यातील बहुतांश रक्कम त्याने जवळपास सात देशांमधील बोगस कंपन्यांमध्ये वळवली होती. याआधी माल्ल्याने आयडीबीआयकडून घेतलेल्या ९०० कोटींच्या कर्जाप्रकरणी त्याच्याविरोधात पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, आता तब्बल ६ हजार कोटींच्या कर्ज प्रकरणात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत या आरोपपत्रांची मोठी मदत भारताला होऊ शकते. मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणी ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात सध्या खटला सुरु आहे.

‘एसबीआय’कडून घेतलेले ६ हजार कोटी रुपये बोगस कंपन्यांमध्ये गुंतवल्याप्रकरणी मल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ‘बँकांनी किंगफिशर एअरलाईन्सला जे कर्ज दिले होते, तो पैसा मल्ल्या आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बोगस कंपन्यांमध्ये वळवला. याबद्दल अमेरिका,ब्रिटन, फ्रान्स आणि आयर्लंडशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या देशांकडून लवकरच उत्तर मिळेल,’ असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पैशांच्या कथित अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी विजय मल्ल्याला भारतात येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एसबीआयच्या नेतृत्त्वाखाली जवळपास १२ हून अधिक बँकांनी २००५ ते २०१० या काळात मल्ल्याच्या किंगफिंशर एअरलाईन्सला हे कर्ज दिले होते. हे कर्ज आणि त्यावरील व्याजाचा विचार केल्यास ही रक्कम ९ हजार कोटींवर जाते. कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी मल्ल्याविरोधात मागील वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


Next Story
Share it
Top
To Top