ठाणे | प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा कारवाई करत एका संशयित दहशतवाद्याला अटक केले आहे. एटीएसने केलेल्या कारवाईत लॅपटॉप, टेबलेट, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, राउटर आणि काही मोबाईल जप्त केले आहेत. यासोबतच एटीएसला संशयिताकडे एक डायरीही सापडली आहे.
https://twitter.com/ANI/status/1089429500977328128
एटीएसने आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयावरून याआधी (२२ जानेवारी) मुंब्रा आणि औरंगाबादमधून एकूण ९ जणांना अटक केली होती. एटीएसने सलमान खान, फहाद शाह, झमेन कुटेपडी, मोहसीन खान, मोहम्मद मझर शेख, ताकी खान, सरफराज अहमद, झाहीद शेख आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा या संशयित आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून काही रसायने, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स, धारदार चाकू, मोबाईल्स आणि सिम कार्ड्स पोलिसांनी हस्तगत केली होती. मुंब्र्यातील या आणखी एका अटकेमुळे संशयितांची संख्या १०वर गेली आहे.
ताब्यात घेण्यात आलेले हे ९ जणांचे आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या महिन्यात एनआयएकडून दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. दिल्लीच्या जाफराबाद आणि उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये इसिस संघटनेशी संपर्कात असलेल्या ठिकाणांवर ही मोठी कारवाई करण्यात आली होती.