जळगावात पोलीस आपसात भिडले

जळगावात पोलीस आपसात भिडले

जळगाव - पोलीस आणि आरोपींची चकमक उडाल्याच्या अनेक घटना आपल्याला वाचायला, पाहायला मिळतात. पण पोलीस क्षुल्लक कारणावरून आपसात भिडून, जखमी होईपर्यंत एकमेकांना मारहाण करीत असतील तर ही फारच गंभीर गोष्ट आहे. जळगावातील चिमुकले राम मंदिरात नुकताच हा प्रकार घडला.

पुजेचे साहित्य ठेवण्याच्या कारणावरून सहायक फौजदार नामदेव बाबुराव ठाकरे, पोलीस कर्मचारी गोपीचंद पाटील व राजू देवराम शिंदे यांच्यात शनिवारी सकाळी मंदिराच्या आवारातच हाणामारी झाली. त्यानंतर पाटील व शिंदे यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.

राममंदिरात शुक्रवारी ठाकरे दर्शनासाठी गेले असता तेथील ट्रस्टी पोलीस कर्मचारी गोपीचंद पाटील यांनी त्यांना पुजेचे साहित्य मंदिरात ठेऊन जायचे नाही, असे सांगितले. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला.

याबाबत ठाकरे यांनी तक्रार दिल्यानंतर ट्रस्टी गोपीचंद पाटील यांनीही जिल्हा पेठ पोलिसांकडे ठाकरे यांच्याविरुध्द तक्रार अर्ज दिला आहे. राम मंदिरावर पोलीस कर्मचारी ट्रस्टी आहेत. ठाकरे हे सरकारी पेटी या मंदिरात ठेवतात व तिथेच अंघोळही करतात. त्यामुळे त्यांना विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण करायला सुरुवात केली असे पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, दोघांचे अर्ज घेण्यात आले असले तरी गुन्हा दाखल झालेला नाही.

ठाकरे हे शनिवारी सकाळी पुन्हा मंदिरात गेले असता तेथे गोपीचंद पाटील व राजू शिंदे यांच्याशी त्यांचा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की सर्व जण एकमेकाच्या अंगावर धावून गेले. पाटील व शिंदे या दोघांनी नरडी दाबून जीवे मारण्याचा प्रय} केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. या वादानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याकडे फिर्यादच लिहून दिली, मात्र गायकवाड यांनी हा अदखलपात्र गुन्हा आहे असे सांगून हाकलून लावल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. दरम्यान, ठाकरे हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे.


Next Story
Share it
Top
To Top