मेहतांचे माजी सचिव सचिन पवारला हत्येप्रकरणी अटक

मेहतांचे माजी सचिव सचिन पवारला हत्येप्रकरणी अटक

मुंबई | घाटकोपरमधील राजेश्वर उदानी या हिरे व्यापाऱ्याचा पनवेल परिसरातील नेहरे भागात मृतदेह सापडल्याने एकच खलबळ उडाली आहे. उदानी हा व्यापारी २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाला होता. घाटकोपर पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्गालगत विक्रोळी वाहतूक चौकीसमोरील कॉर्नरला या व्यापाऱ्याची कार पोलिसांना सापडली होती. अपहरणानंतर राजेश्वर उदानींची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवारला शनिवारी (८ डिसेंबर) बेड्या ठोकण्यात आल्या. कॉल डिटेल्स काढल्यानंतर पोलिसांसमोर वेगवेगळी माहिती उघड होताना दिसत आहे.

या व्यापाऱ्याच्या कॉल डिटेल्समधून उदानी यांनी मुंबई, नवी मुंबई आणि रायगडच्या अनेक बार गर्ल्स आणि टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींशी संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच संदर्भात पोलिसांनी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिच्यासहीत जवळपास २५ जणांची चौकशी केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाटकोपर परिसरात राहणारा राजेश्वर हा हिरे व्यापारी घरी चार तासात परत येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो परतला नाही. त्यानंतर मुलगा रोनक याने पंतनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. या संदर्भात पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. राजेश्वर दुसऱ्याच एका गाडीतून नवी मुंबईच्या दिशेने जाताना या फुटेजमधून दिसत आहे.

७ डिसेंबर रोजी पनवेल भागातील झाडाझुडपात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. परंतु, त्याची ओळख पटवणे कठिण होते. राजेश्वर यांचे कपडे आणि बूटांची ओळख पटवल्यानंतर हा मृतदेहाची ओळख पटली.यानंतर पोलिसांनी राजेश्वर यांचे कॉल डिटेल्स काढले.


Next Story
Share it
Top
To Top