हळदी समारंभात हवेत गोळीबार; नवरदेवासह मित्रांविरोधात गुन्हा दाखल

हळदी समारंभात हवेत गोळीबार; नवरदेवासह मित्रांविरोधात गुन्हा दाखल

बीड | अतिउत्साह कधी- कधी कोणत्या वाटेने आडवा येईल, हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या, बीडच्या अंबाजोगाईमध्ये समोर आला आहे. आपल्या लग्न समारंभानिमित्त आयोजित हळदी समारंभाच्या कार्यक्रमात, नवरदेवासह त्याच्या मित्राने, हातात बंदूक घेऊन डीजेच्या ठेक्यावर हवेत गोळीबार केला आहे आणि आता हे प्रकरण नवरदेवाला चांगलाचं महागात पडलं आहे. हळद फिटताच त्याच्यावर आता जेलमध्ये राहण्याची वेळ आली आहे.

अंबाजोगाई शहराजवळील सायली लॉन्स या मंगल कार्यालयात, हळदीच्या कार्यक्रमात, नवरदेवासह त्याच्या मित्राने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या नवरदेवासह त्याच्या मित्राला अंबाजोगाई शहर पोलिसांनी ५ मार्चच्या मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. बालाजी भास्कर चाटे रा. साकुड ता. अंबाजोगाई असे अटक केलेल्या नवरदेवाचे तर बाबा शेख रा. अंबाजोगाई असे त्याच्या मित्राचे नाव आहे. हे दोघे साकुड येथील शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने दोघांना मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान अटक करण्यात आली आहे.

दरम्यान लग्नाचा 'बार' उडण्याआधीच नवरदेवाने गोळीबार केल्याने, ऐन लग्नाच्या तिसऱ्याचं दिवशी त्याच्यावर फरार होण्याची वेळ आली. पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी घरी गेले होते . त्यावेळी तो सापडला नव्हता. अखेर त्याला पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले आहे. यावेळी न्यायालयाने नवरदेव बालाजी चाटेसह मित्र बाबाला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान आपलं लग्न होतयं, हा त्याचा आनंद गगनाथ मावला नाही. त्यामुळे हळदीच्या समारंभाच्या कार्यक्रमात, डिजेवर डान्स करत, त्याने हवेत गोळीबार केला. आणि यामुळे आता त्याला लग्नाच्या बेडीनंतर पोलिसी हातकड्या पडल्या आहेत. आणि याच अतिउत्साहाच्या भरात केलेल्या कृत्यामुळे, हळद फिटली नाही तोवरचं आता त्याच्यावर जेलमध्ये राहण्याची वेळ आली आहे. यामुळे या अतिउत्साही नवरदेवाची अन् त्याच्या जेलवारीची बीड जिल्ह्यात चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.


Next Story
Share it
Top
To Top