लखनऊ: फतेहपूर सिक्री येथे स्विस दाम्पत्याला चार जणांनी बेदम मारहाण केली. या महिलेसोबत सेल्फी काढण्याच्या प्रयत्नातून ही घटना घडली आहे.
स्वित्झर्लंडमधील क्यून्टीन जर्मी क्लर्क (वय २४) आणि त्याची प्रेयसी मारी ड्रोझ हे दोघे सप्टेंबरमध्ये भारत भ्रमंतीवर आले आहेत. रविवारी क्यून्टीन आणि त्याची प्रेयसी ड्रोझ हे दोघे फतेहपूर सिक्री येथील रेल्वे रुळावरून चालत जात होते. यादरम्यान चार जणांनी त्यांचा पाठलाग केला. ‘आम्ही जात असताना चौघांनी आमच्याकडे बघून शेरेबाजी केली. यानंतर चौघांनी आमचा पाठलाग सुरू केला.
काही वेळातच त्यांनी आम्हाला अडवले आणि मारीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. याला विरोध दर्शवताच चौघांनी आम्हाला मारहाण केली, असे क्यून्टीनने पोलिसांना सांगितले. लाकडी दांडक्यांनी आम्हाला मारहाण करण्यात आली. आम्ही रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होतो. मदतीसाठी याचना करत होतो. पण कोणीही आमच्या मदतीला आले नाही. याऊलट अनेक जण आमचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते, असे त्याने सांगितले.
ड्रोझला वाटत होते की ते चौघे महिलेला मारहाण करणार नाहीत. तिने मला वाचवण्याचा प्रयत्न करताच त्यांनी तिलादेखील मारहाण केली, असे क्यून्टीन सांगतो. त्यांनी आमच्यावर हल्ला का केला हेच मला समजत नाही, असे त्याने म्हटले आहे. या दाम्पत्यावर सध्या दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.