ठाणे केराच्या बादलीवरून एका महिलेसोबत तरूणांने वाद घातला होता. यावेळी त्याने महिलेला छम्मक छल्लो बोलल्याने ठाणे कोर्टाने एक रूपयाचा दंड आणि कोर्ट संपेपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा दिली आहे.
आरोपी एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहतो. तर पाचव्या मजल्यावर तक्रारदार महिला राहते. 9 जानेवारी 2009 रोजी ही महिला व तिचा पती सकाळी सव्वा नऊ वाजता फेरफटका मारून परत येत होते. फ्लॅटमध्ये जाताना या महिलेचा पाय आरोपी व्यक्तिच्या केराच्या बादलीला लागला व बादली उलटी झाली. यामुळे आरोपी पुरुषला राग आला आणि त्याने त्या महिलेला छम्मक छल्लो म्हटले. हे शब्द महिलेचे पावित्र्य भंग कराणारे असून या शब्दांमुळे माझा अपमान झाल्याचा आरोप या महिलेने केला.
तिने सदर व्यक्तिविरोधत सोसायटीकडे तक्रार केली परंतु तिची दखल घेण्यात आली नाही. अखेर या महिलेने कायद्याची मदत घेतली. सदर पुरुषाने न्यायालयात युक्तिवाद केला की या महिलेने जाणुनबुजून आपल्याला त्रास दिला व केराची बादली मुद्दाम पाडली. परंतु न्यायाधीशांनी त्याची बाजू अयोग्य ठरवली.
छम्मक छल्लो हे हिंदी शब्द आहेत. इंग्रजीत त्यांना काही अर्थ नाही असे सांगतानाच न्यायाधीशांनी भारतीय संदर्भात या शब्दांचा अर्थ लावला पाहिजे असे सांगत हे शब्द महिलेचा अपमान करणारे असल्याचा निष्कर्ष काढला. हे शब्द महिलेचा सन्मान करण्यासाठी नाही तर तिला हीन लेखण्यासाठी वापरले जातात असेही त्यांनी सांगितले. हे शब्द ऐकल्यावर कुठल्याही महिलेला मानसिक त्रासच होतो, त्यामुळे कलम 509 अंतर्गत महिलेचा अवमान झाल्याचे सिद्ध होत असल्याचा निष्कर्ष न्यायाधीश आर. टी. इंगळे यांनी काढला.
अखेर, न्यायाधीशांनी छम्मक छल्लो हे शब्द वापरत महिलेची बदनामी करणाऱ्या या पुरुषाला एक रुपया दंड व कोर्ट संपेपर्यंतचा दिवस तुरुंगात घालवण्याची शिक्षा दिली.