मुंबई | मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दितील मच्छीमार नगर येथे रहाणा-या एकाच कुटुंबातील तीन लोकांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कफ परेडच्या शिवसृष्टी नगर मच्छीमार वसाहतीत आज एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडील आणि मुलगा अश्या तिघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची बाब उघडकीस आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. गरिबीला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला तरी आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रवीण पटेल(40), वीणा प्रवीण पटेल(35), मुलगा प्रभू प्रवीण पटेल(11) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. स्वतःच्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
साधारण चार वर्षांपासून हे कुटुंब या चाळीत राहत होते.कोणाशीही जास्त बोलनं नसल्यामुळे त्यांच्याविषयी अधिक माहिती शेजाऱ्यांनी देण्यास टाळले आहे. आपल्या दोन मुलांसोबत प्रवीण पटेल हे गेल्या चार वर्षांपासून राहत होते. प्रवीण पटेल मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करत होते आणि पत्नीसुद्धा दुसरीकडे काम करत असल्याची माहिती मिळते आहे. लहान मुलीला कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासले होते आणि यातच तिचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळली आहे. उरलेल्या तिघांनी कालच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांना त्यांच्या घरातून एक आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठी मिळाली असून त्याचा मजकूर अद्याप समजू शकलेला नाही.
मृत कुटुंबीयांच्या शेजारी चौकशी केली असता मिळालेल्या माहितीनुसार "कालपासून त्यांनी दरवाजा उघडला नाही म्हणून आम्ही सकाळी दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणतीच प्रतिक्रिया अली नाही घटनेला बराच वेळ उलटून गेला होता त्यामुळे दुर्गंधी येत होती म्हणून आम्ही पोलिसांना बोलावून घेतले दरवाजा तोडून पाहिल्यावर हे दृश्य पाहायला मिळाले" असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.