दरोडेखोरांकडून बँक अधिकाऱ्यासह पत्नीचा खून; दोन मुली जखमी

दरोडेखोरांकडून बँक अधिकाऱ्यासह पत्नीचा खून; दोन मुली जखमी

बीड : येथील एका बँक अधिकाऱ्याच्या घरावर दरोडा टाकत दरोडेखोरांनी अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. या हल्ल्यात दरोडेखोरांच्या मुलीही जखमी झाल्या आहेत. या हत्याकांडामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आदिनाथ घाडगे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते बीडच्या भवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेत प्रमुख वसुली अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. गेवराईतील सरस्वती कॉलनीतील त्यांच्या घरावर पहाटे साडेतीनच्या सुमारास दरोडेखोरांनी हल्लाबोल केला.

दरोडेखोरांनी ठोठावलेले दार उघडणाऱ्या घाडगे यांच्या पत्नी अलका यांची प्रथम हत्या करण्यात आली. त्यानंतर झोपेत असलेल्या आदिनाथ आणि बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव आणि दुसरी मुलगी स्वाती घाडगे यांच्यावरही हल्ला झाला. तान्हुल्याला उराशी कवटाळून वर्षाने दरोडेखोरांनी केलेले वार स्वतः झेलले. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली असून तिला औरंगाबादला हलविण्यात आले आहे. तसेच स्वातीही जखमी झाली आहे. या हल्ल्यानंतर दरोडेखोरांनी घाडगे यांच्या घरातील लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला.


Next Story
Share it
Top
To Top