HW News Marathi
मनोरंजन

जाणून घ्या… धनत्रयोदशीचे महत्व !

आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्‍नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका प्रचलित आहे.

या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे. त्या दिवसाला “धन्वंतरी जयंती” असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काही जणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी,योगिनी,गणेश,नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून नैवेद्य दाखवितात. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो. जैनधर्मीय या दिवसाला ‘धन्य तेरस’ वा ‘ध्यान तेरस’ म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या दिवाळीत असे बनवा बेसनाचे लाडू

News Desk

माझ्या आठवणीतली दिवाळी | Rutuja Bagwe

News Desk

यशवंत देव यांच्या निधनाने संगीत विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावले | तावडे

Gauri Tilekar