महाराष्ट्रातील चळवळींचे राजकारण

महाराष्ट्रातील चळवळींचे राजकारण

पूनम कुलकर्णी | महाराष्ट्राच्या इतिहासात नेते म्हटले की, चळवळ ही आलीच. मग ते ब्रिटीश कालीन चळवळ असो किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो या चळवळींतून महाराष्ट्रासह देशाला अनेक बडे नेते लाभले. मग ते महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई, जॉर्ज फर्नांडीस, कॉंम्रेड डांगे, बाळासाहेब ठाकरे यांसारख्या अनेक नेत्यांनी त्या काळी महाराष्ट्रातील राजकारणात अमुल्य असे योगदान दिले आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी ब्राम्हणेतर चळवळीस नेतृत्व दिले. आणि त्यांनतर राजकीय क्षितिजावर आलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणास सामाजिक परिमाण दिले. त्याच वेळी उजव्या धार्मिक बाजूस आर्यसमाजी चळवळीने काही प्रमाणात सुधारणेचे परिमाण देण्याचा प्रयत्न केला. धार्मिक आणि भाषिक अस्मितांना स्वातंत्र्यवीर सावरकरानी फुंकर घातली.

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी महाराष्ट्रातील डाव्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. महात्मा गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने मध्यमवर्गीय चेहरा सोडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. व त्यांच्या नेतृत्वाखालील लोकांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामाजिक आणि आर्थिक विषमता घालवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने मराठी भाषिक आणि संस्कृतीस एकसंघ करून राजकीय अस्मितेस राजमान्यता मिळवून दिली. स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीस प्रामुख्याने वेगवेगळ्या वेळी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या डाव्यांनी शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष इत्यादींच्या बळावर विरोधी पक्षाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला.

पुर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांचे पदार्पण हे चळवळींच्या माध्यमातून झालेले पहायला मिळते. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबोडकर यांच्या सारख्या नेत्यामुळे दलित चळवळ उभी राहीली. समाजातील वंचित घटकांना आपल्या हक्कांची जाणीव झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता महाराष्ट्राला मिळाला. शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शरद जोशींसारखा नेता नावारुपास आले. कम्युनिस्ट चळवळीमुळे कॉंम्रेड डांगेसांरखा नेता घडला. परंतु सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अशा चळवळीतून राजकारणात आलेल्या नेत्यांची प्रचंड कमतरता आहे. सध्या राजकारणात सक्रिय असलेल्या अनेक नेत्यांना राजकीय वारसा तर काहींना राजकीय वर्दहस्त लाभल्यामुळे त्यांनी राजकारणात आपले पाय रोवले आहेत. परंतु ख-या चळवळीचा साधा लवलेश ही नसल्यामुळे कुठेतरी या नेत्यांमधल्या उतावळेपणा त्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामधून अनेकदा पहायला मिळतो.

बाळासाहेब ठाकरे यांना जरी चळवळीची पार्श्वभूमी असली तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना कोणत्याही चळवळीचा विषेश इतिहास नाही. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर्दहस्तामुळे सुप्रिया सुळे आणि अजित पवार राजकारणात आल्याचे पहायला मिळते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन शरद पवार राजकारणात उतरले आणि त्यांनी राजकीय वाटचालीला सुरुवात केली परंतु हे समीकरण अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत कुठेच दिसत नाही. महाराष्ट्रात शरद पवार वगळता सध्या असा एकही नेता नाही ज्याला चळवळीचा इतिहास आहे.

सध्याचे महाराष्ट्रात सुरु असलेले राजकारण जनहिताच्या दृष्टीने नसून प्रत्येक राजकारण्याने ते स्वहिताचे केले आहे. त्यामुळे राज्यात केंद्रात एकाच पक्षाची सत्ता असली तरी शेतक-यांना तसेच समाजातील व्यक्तींना आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. महाराष्ट्राची सध्याची राजकीय अस्थिरता पहाता समाजाच्या दृष्टीने कळवळा असलेले आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे व्यक्तीमत्व महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झाल्यास नक्कीच या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल यात शंका नाही.


Next Story
Share it
Top
To Top