मुंबई | १९७७ साली आखातातील अबू धाबीमध्ये पोटापाण्यासाठी स्थायिक असलेल्या ७-८ कुटुंबांनी दीड दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. प्रथम हा उत्सव सभासदांच्या घरी साजरा केला जात असे. १९९२ साली 'महाराष्ट्र मंडळ अबू धाबी'ची स्थापना झाल्यानंतर गणेशोत्सव साजरा करण्याची जबाबदारी मंडळाने आनंदाने स्वीकारली.
सुरुवातीला साधेपणाने साजरा होणाऱ्या उत्सवाचे रुपांतर आता दिमाखदार सोहळयात झाले आहे. गेली काही वर्षे 'इंडिया सोशल आणि कल्चरल सेंटर'च्या भव्य सभागृहात मोठया उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी या उत्सवात सहभागी होणाऱ्या कुटुंबांची संख्या आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढतच आहे. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन गणेशोत्सव सभासदांच्या दिवाणखाण्यातून हॉटेलच्या सभागृहात साजरा होऊ लागला.
दरवर्षी मंडळातील सभासदसदांच्या कल्पकतेतून गणरायासाठी मखर आणि देखावे
यंदाच्या 'महाराष्ट्र मंडळ अबू धाबी'च्या कार्यकारिणी समितीने देखाव्यासाठी पर्यावरणपुरक संकल्पना ठरवली होती. थर्मोकोल, प्लॅस्टिक आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस या सारख्या पर्यावरण विघातक घटकांचा देखाव्यासाठी उपयोग न करण्याचा निर्णय या समितीने घेतला. त्यासाठी या वर्षीच्या कार्यकारिणी समितीने मुंबईच्या उत्सवी संस्थेकडून रिसायकल्ड कागद आणि पुठ्यांचा बनवलेला, मुंबईचे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आणि राजस्थानच्या जयपूर पॅलेसची छटा असलेला असा हा अतिशय सुरेख देखावा आयात केला होता. या मंडळाकडून शाडूची २२ इंच मुर्ती खास नाशिकहून मागवण्यात आली होती. भारतातील सर्व प्रांतीय नागरिकांसह या वर्षी जपान, रोमेनिया आणि पाकिस्तानीचे नागरिकही सहभागी झाले होते.
अबू धाबीमधील प्रतिष्ठित व्यक्तींनी आणि भारतीय दूतावासातील मान्यवरांनीदेखील आवर्जून महाआरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सांस्कृतिक कार्यक्रमांत ढोल-ताशा बरोबरच शोभायात्रा, लेझीम, देव-देवतांच्या गाण्यावर नृत्य असा शानदार कार्यक्रम येथे यावेळी पार पडला. सांस्कृतिक कार्यक्रमांसहित 'भजन भारती' या दक्षिण भारतीय भक्तांच्या संस्थेकडून भजन, गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्र आवर्तनेदेखील करण्यात आली होती. या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत केवळ भारतीयच नव्हे तर इतर देशांतील, प्रांतातील भाविक देखील सामील झाले होते.