गौरी टिळेकर | अवघ्या काहीच दिवसांत सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वच मूर्तीशाळांमध्ये आता मोठी लगबग पाहायला मिळत आहे. अशीच लगबग आता पाहायला मिळतेय कुर्ल्याचे दिव्यांग मूर्तिकार विक्रांत पांडरे यांच्या सिद्धिविनायक गणेश चित्रशाळेत. बाप्पाच्या मुर्त्या घडवून त्याची सेवा करणारा हा मूर्तिकार म्हणतो, बाप्पाने मला समाधान दिले.
लहान वयातच विक्रांत पांडरे यांनी बाप्पाच्या मुर्त्या घडविण्याची ही कला आत्मसात झाली. तासंतास त्यांचे मन ह्या कामात रमत असे. एका अपघातामध्ये त्यांच्या पायाला मोठी इजा झाली. परंतु त्यानंतरही त्यांनी त्यांच्या बाप्पाच्या या सेवेत मात्र कधीही खंड पडू दिला नाही. 1998 साली त्यांनी स्वतःची 'सिद्धीविनायक गणेश चित्रशाळा' सुरू केली आणि तिथून त्यांच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली.
विक्रांत पांडरे यांच्या मूर्तीशाळेचे विशेष म्हणजे भारतीय जवाणांसाठी कुर्ल्यातून जम्मू-काश्मीरला भारत-पाकिस्तान सीमेवर जाणारा बाप्पा म्हणजे हा यांच्याच मूर्तीशाळेत घडविला जातो. भारतीय जवान हे देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतात. परंतु दहशतवादयांपासून आपल्या जवानांच्या संरक्षणासाठी विघ्नहर्त्या बाप्पाची प्रतिष्ठापना गेल्या तीन वर्षांपासून जम्मू-काश्मीरमधील लाईन ऑफ कंट्रोलवर केली जातात. 'किंग ऑफ एलओसी' अशी या बाप्पाची ख्याती आहे.
त्यांच्या मूर्तीशाळेत मूर्तिकलेत पारंगत असे पाच ते सहा कारागीर गेल्या अनेक वर्षांपासून बाप्पाच्या मुर्त्या घडवीत आहेत. त्यापैकी अनेक कारागीर हे वर्षाचे बाराही महिने मुर्त्या घडविण्याच्या कामातच व्यस्त असतात. बाप्पाच्या कामात आमचे मन रमते आणि आम्हाला आनंद मिळतो, असे हे सर्व कारागीर अतिशय मनापासून सांगतात.