आगमन बाप्पाचे | पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या सुबक मुर्ती

आगमन बाप्पाचे | पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या सुबक मुर्ती

गौरी टिळेकर | सण-उत्सव साजरे करताना आपल्या सर्वांकडूनच पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते. याचसाठी समजातील अनेक व्यक्ती वर्षांनुवर्षे झटत असतात. अशाच सामाजिक भान जपणाऱ्या लोकांपैकी एक म्हणजे अभिजीत जोशी. दादरमधील शाडूच्या मातीने तयार केलेल्या बाप्पाच्या मूर्तींचे हे विक्रेते आहेत. खरंतर अभिजीत जोशी हे तिसऱ्या पिढीतीतले. त्यांच्या आजोबांपासूनचा हा व्यवसाय आहे. गेली 73 वर्षे त्यांचा हा व्यवसाय सुरू असून लोकांनी पर्यावरणपूरकच सण साजरे करावेत, असा संदेश त्यांच्या तिन्ही पिढ्या वर्षानुवर्षे देत आहेत.

जोशी यांच्या बाप्पाच्या मुर्ती दादरमध्ये विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यांच्याकडे वर्षानुवर्षे पेण येथूनच बाप्पाच्या तयार मुर्ती इथे आणल्या जातात. तेथील त्यांचे मूर्तिकारही ठरलेले आहेत. जोशी कुटुंबाची ही जशी तिसरी पिढी या व्यवसायात आहे तशीच त्या मूर्तिकारांच्या कुटुंबाची देखील तिसरीच पिढी आहे. पुढे या मुर्ती दादरमध्ये आणल्यानंतर त्या मूर्तींना पुन्हा एकदा आवश्यकत्येप्रमाणे रंग दिले जातात. कारण मातीमध्ये रंग पटकन शोषले जातात त्यामुळे मूर्तीवरील रंग फिके दिसतात. इथे अगदी सहा इंचापासून ते 2 फुटांपर्यंतच्या बाप्पाच्या मुर्ती उपलब्ध असतात.

सचिन तेंडुलकर, रामदास पाध्ये अशा दिग्गज मंडळींच्या घरी विराजमान होणारे बाप्पा हे वर्षानुवर्षे जोशी यांच्याकडूनच जातात. इथे काही मूर्तींना त्यांच्या प्रकारावरून विशेष अशी नाव दिलेली आहेत. उदा. सावकार, लालबागचा राजा, दगडूशेठ, मध्यम नक्षी सिंहासन, मैसूरी सिंहासन, मैसूरी गोल चौरंग, नवीन कमळ, लहान-मध्यम-मोठे आसन इत्यादी इत्यादी.

शाडूच्या मातीच्या बाप्पासोबत जोशी यांच्याकडे 21 पत्री आणि पर्यावरणपूरक मखर देखील उपलब्ध आहेत. गणेश चतुर्थी दिवशी बाप्पाला 21 पाने वाहण्याची परंपरा आहे. परंतु ही जुडी जर तुम्ही बाहेरून घ्यायला गेलात तर बऱ्याचदा सरमिसळ करून ती विकली जातात. इथे मात्र देशांतील वेगळ्या शहरांतून मागवून त्यांची एक जुडी तयार केली जाते. त्याचप्रमाणे पर्यावरणाला हानी पोहोचवणार नाहीत असे मखरदेखील येथे उपलब्ध असतात.

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. आपण हे 11 दिवस बाप्पाची अत्यंत मनोभावे पूजा अर्चा करतो. मग हा बाप्पा विसर्जित करताना देखील तो योग्य रीतीने विसर्जित होणे आवश्यक आहे. शाडूच्या मातीच्या मुर्ती ह्या कोणत्याही रासायनिक द्रव्यांचा वापर न करता घरच्या घरी विसर्जित करता येतात. आपल्या लाडक्या बाप्पाचे अवशेष विसर्जनानंतर समुद्र किनारी ज्या अवस्थेत पडलेले दिसतात ते नक्कीच काळीज पिळवटून टाकणारे असते. त्याचप्रमाणे यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते, हा एक गंभीर मुद्दा आहे. म्हणूनच सामाजिक भान जपत पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरे करण्याचा हा संदेश देण्याचे काम अनेक मंडळी वर्षानुवर्षे करीत आहेत. आपल्यापैकी प्रत्येकानेच यावर गांभीर्याने विचार करून ते विचार कृतीत आणण्याची गरज आहे.


Next Story
Share it
Top
To Top