पाच दिवसांच्या बाप्पांसोबत गौरींचे थाटात विसर्जन

पाच दिवसांच्या बाप्पांसोबत गौरींचे थाटात विसर्जन

मुंबई | पाच दिवसांच्या बाप्पा आणि गौरीचे आज थाटात विसर्जन करण्यात येणार आहे. कोणतेही सण साजरे करताना त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. दरवर्षी बाप्पाच्या विसर्जनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेकडून कृत्रिम तलावांची सोय करण्यात येते. यावर्षी देखील महापौर निवासाच्या शेजारीच पर्यावरणपूरक कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर करत, सोमवारी पाच दिवसांच्या बाप्पांसोबत गौरार्इंचे विसर्जन करण्यात येत आहे. अखेर शेवटची मंगल आरती आटोपून बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आग्रहाचे निमंत्रण देऊन, साश्रू नयनांनी निरोप देण्यात येईल. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी रस्ते, चौपाट्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. वाहतूक पोलीस, स्वयंसेवक, महापालिका कर्मचारी, सुरक्षा रक्षक, कर्मचारी सज्ज झाले आहेत. सकाळी गौराईची पूजा केल्यानंतर, बाजरीची भाकरी, गोडधोड पदार्थाचा नैवेद्य असलेली शिदोरी बांधून या शिदोरीचे गौराईसोबत विसर्जन करण्यात आले.

विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज

दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर आता पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे मुंबई शहर आणि उपनगरात विसर्जनाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. विसर्जन स्थळांवर अतिरिक्त तराफे, बोटी, जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विसर्जन स्थळांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याता आल्या आहेत. विसर्जन स्थळांवर अतिरिक्त तराफे, बोटी, जीवरक्षक, स्टील प्लेट्स, मोटरबोट, प्रथमोपचार केंद्र व रुग्णवाहिका, तात्पुरती शौचालये, जर्मन तराफा, सर्च लाइट, स्वागत कक्ष आदींची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, म्हणून मुंबईतील चौपाट्या आणि विसर्जन स्थळांची महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पाहणीही केली आहे.

दादर, गिरगाव, माहिम, जुहू, आदी ठिकाणच्या चौपाट्यांवर, तसेच पवई तलाव, भांडुपेश्वर कुंड, पूर्व द्रुतगती महामार्गावरचे मोरया उद्यान तलाव, तसेच सायन तलाव इत्यादी ठिकाणी पालिकेने विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. दरम्यान, गणेशोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातील पाहुणे गिरगाव चौपाटी येथे येतात. त्यांच्याकरिता मंडपाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.


Next Story
Share it
Top
To Top