मुंबई | गेली नऊ वर्षे लोअर परळच्या स्वामी समर्थ अध्यात्म परिवाराकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात असून असून यंदा परिवाराने तयार केलेल्या भगव्या महालात बाप्पा विराजमान झाले आहेत. ‘लालबागचा राजा’ची प्रतिकृती असलेल्या त्यांच्या मूर्तीचे वैशिष्टय़े म्हणजे या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही.
श्री लोकरे यांचे वडील हरिओम विजयानंद स्वामी हे श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत. वडिलांच्या प्रेरणेतून आणि श्री स्वामी समर्थ अध्यात्म परिवाराच्या सहकार्याने श्री लोकरे यांच्या लोअर परळच्या त्रिशूळ इमारतीतील घरी 2009 सालापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. ‘लालबागचा राजा’वर श्री लोकरे यांची प्रचंड श्रद्धा आहे. म्हणून त्यांनी अभिषेक पूजेसाठी पंचधातूची सुवर्णलेपित श्री गणरायाची मूर्ती असतानादेखील पूजेसाठी फायबरची ‘लालबागचा राजा’सारखी दिसणारी मूर्ती तयार करून घेतली.
गुजरातमधील सुप्रसिद्ध मूर्तिकार अनिकेत मेस्त्री यांनी ती तयार केली आहे. ही मूर्ती वर्षभर काचेमध्ये बंद असते आणि दरवर्षी तिला गणेशोत्सवात दहा दिवसांसाठी बाहेर काढले जाते. यंदा श्रींचा राजा भगव्या महालात विराजमान झाला आहे. या महालाचे रंगकाम श्री लोकरे तसेच मिलिंद पोटफोडे यांनी केले असून श्रींचा राजाची प्रभावळ यंदा लक्ष्मीस्वरूपात आहे.
या गणेशाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे बाप्पाची आरती. या आरतीसाठी भाविकांची गर्दी होत असते. श्रींचा राजाची महाआरती अगदी पारंपरिक पद्धतीने केली जाते. या आरतीला उपस्थित राहणारी पुरुष मंडळी सोवले नेसूनच आरती करतात. तसेच आरती सुरू होण्यापूर्की 6 शंखांचा नाद , घंटा नाद होतो क नगारा काजकला जातो. त्यामुळे इथले वातावरण अगदी भक्तिमय झालेले पाहायला मिळते. त्यांच्या या आरतीचा मान कलाकार तसेच पोलीस दलास दिला जातो.