माटुंग्याच्या फुलमार्केटमध्ये गणेश भक्तांची गर्दी

माटुंग्याच्या फुलमार्केटमध्ये गणेश भक्तांची  गर्दी

धनंजय दळवी | मुंबईत गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू आहे. भाविकांची बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. मुंबईतील मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहे. आणि बाप्पाला भेटायला जातांना खाली हात जाणार तरी कसं ? म्हणून भक्त फुल ना फुलांची पाकळी घेऊन जातात.

गणेशोत्सव मंडळांच्या मंडपाच्या सजावटीबरोबच गणेशोत्सवात महत्वाची असते ती बाप्पाच्या मूर्तीसमोरील सजावट आणि बाप्पाला दररोज लागणारा भलामोठा फुलांचा हार. हे भलेमोठे हार मिळण्याचं मुंबईतलं ठिकाण म्हणजे माटुंगा स्टेशनजवळील हारगल्ली. मुंबईतील जवळपास सर्व छोटी-मोठी गणेशोत्सव मंडळं गणपतीच्या १० दिवसात माटुंग्याच्या या हारगल्लीतून दररोज हा भलामोठा हार मागवतात. आणि या हाराची किंमत ८०० रु. पासून ते २०,००० रु. पर्यंत आहे.

हे मोठे हार बनवण्याची लगबग गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवसापासून सुरू होते. दरवर्षी गणेशप्रतिष्ठापनेच्या पूजेच्या दिवशी भल्या पहाटे मंडळाचे कार्यकर्ते हे भलेमोठे हार घेण्यासाठी माटुंग्याच्या हार गल्लीत गर्दी करतात. गणेशोत्सव म्हटला की जास्वंदी, गुलछडी, लीली, चाफा, गुलाब, झेंडू, मोगरा आदी फुलांना तेजीचे दिवस येतात. अश्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं वापरून हे मोठे हार तयार करत असल्याने माटुंग्याच्या हारगल्लीत या हारांना मुंबईतील मंडळांकडून सवार्धिक मागणी असते. इथे हार तयार करण्यासाठी वापरली जाणारी फुलं ही ताजी आणि उत्तम प्रकारची वापरली जात असल्याने मंडळाचा हेच हार घेण्याकडे कल असतो.


Next Story
Share it
Top
To Top