आगमन बाप्पाचे | २१ विविध प्रकारच्या मोदकांचा प्रसाद

आगमन बाप्पाचे | २१ विविध प्रकारच्या मोदकांचा प्रसाद

मुंबई | "यो मोदकसहस्त्रेण यजति स वांछितफलमवाप्नोति" असे अथर्वशीर्षच्या फळश्रुतीमध्ये बाप्पाल प्रिय अशा मोदकांचा उल्लेख केला आहे. त्यात म्हटले की, एखाद्या भक्ताने बाप्पाला १ हजार मोदकांचा प्रसाद चढवला तर बाप्पा त्या भक्ताची मनोकामना पूर्ण करतो. म्हणजे त्या भक्ताच्या सर्व ईच्छा पूर्ण होता.

गणेशोत्सवा हा अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहचला आहे. बाप्पाला खूश करण्यासाठी भक्त विविध प्रकारचे मोदक तयार झाले आहेत. तर काहींनी आधुनिक टच देऊन नवीन पद्धतीने मोदक बनवितात. यंदा बाप्पाला विविध प्रकारचे २१ मोदक देऊन खूश करा

उकडीचे मोदक

तांदळाची उकड तयार करून त्यात ओले खोबरे व गूळ याचे सारण भरून मोदकाचा छान आकार देऊन वाफवावे. हे पारंपारिक मोदकांचा प्रकार असून संपुर्ण महाराष्ट्रात बाप्पासाठी बनविला जातो.

गूळ-कोहळ्याचे मोदक

हा विदर्भातील मोदकाचा एक प्रकार आहे. त्यामुळे तसा कमी परिचयाचा असून यात गूळ, लाल कोहळा व तेवढीच कणिक एकत्र मळावी. मोदकाचा आकार देऊन मंद आचेवर तळून घ्यावे.

पुरणाचे मोदक

नुसते पुरण वाटून पानावर वाढण्यापेक्षा याच पुरणाचे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून त्याचे मोदक तळून किंवा वाफवूनसुद्धा घेतात.

तीळगुळाचे मोदक

गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावेत व हे सारण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळावे. किंवा तीळ व गुळाचे सारण गरम असतानाच साच्यामध्ये घालून मोदक करावे. हा प्रकार यवतमाळ भागात विशेषत: केला जातो.

बेसनाचे मोदक

बेसनाच्या लाडूच्या कृतीप्रमाणे आधी बेसन भाजून घेऊन या सारणाला साच्यात घालून मोदकाचा आकार द्यावा. यामध्ये एक-एक काजू भरावा. म्हणजे बेसन मोदक तयार.

मैद्याचे उकडीचे मोदक

मैद्याची पारी लाटून आतमध्ये तुमच्या आवडीचे कोणतेही गोड किंवा तिखट सारण भरून त्याचे मोदक करून वाफवून घ्यावेत. हा प्रकार काहीसा मोमोजसारखा.

काजूचे मोदक

काजू मोदक करताना काजूची पूड करून त्यासोबत थोडी वेलची टाकावी. यामुळे मोदकाला एक वेगळीच चव येते. काजूकतलीसाठीचे साहित्य सारणासाठी घेऊन यामध्ये खवा, खडीसाखर भरून याला मोदकाचा आकार द्यावा.

पनीर मोदक

पनीर टिक्का, पनीर मसाला, मटर पनीर यांचे नाव काढले, तरी तोंडाला पाणी सुटते. याच पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पूड भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा प्रकार विशेषतः दिल्लीला मिळतो.

खव्याचे मोदक

हा प्रकार तसा सगळीकडे दिसतो. यामध्ये खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करतात.

बेक केलेले मोदक

तळलेले आणि उकडलेले मोदक खाऊन बाप्पा आणि भाविकही कंटाळतात. त्यासाठी खास बेक केलेल्या मोदकांचा पर्याय आहे. खोबरं, किसमिस, खव्याचे सारण मैद्याच्या सप्तपारीमध्ये भरून मस्त बेक करून बाप्पाला नैवेद्य दाखवा.

फ्रुट मोदक

गणपतीच्या दिवसांत भरपूर फळे येतात. वेगवेगळी फळे मिक्स फ्रुट जॅममध्ये मिसळून हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.

मिक्स मोदक

या प्रकारातून तुम्ही बाप्पालाही रिमिक्सची चव चाखवू शकता. यासाठी पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे.

मनुकांचे मोदक

हे मोदक करण्यास सोपे आणि सर्वांनाच आवडतील असे आहेत. मनुका, काजू एकत्र करून त्यात थोडी दूध पावडर घालून त्याचे मोदक वळावे.

कॅरॅमलचे मोदक

मोदकांचा हा प्रकार लहानग्यांच्या पसंतीचा. यासाठी पनीर, खवा, काजू, किसमिस, साखर एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक साखरेच्या कॅरॅमलमध्ये बुडवून थंड करून मगच खा.

काजूचे मोदक

काजू मोदक करताना काजूची पूड करून त्यासोबत थोडी वेलची टाकावी. यामुळे मोदकाला एक वेगळीच चव येते. काजूकतलीसाठीचे साहित्य सारणासाठी घेऊन यामध्ये खवा, खडीसाखर भरून याला मोदकाचा आकार द्यावा.

फुटाण्यांचे मोदक

फुटाणे बारीक करून त्यात साखर, व तूप घालून चांगले मळावे. या पिठाला मोदकाचा आकार द्यावा. हा प्रकार गरम न करता चटकन होणारा प्रकार आहे.

तांदळाचे गुलकंदी मोदक

प्रथम तांदुळाची उकड काढून त्यात गुलाब पाकळ्या किंवा गुलाबजल टाकावे. त्यानंतर उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरून हे मोदक मंद आचेवर तळून किंवा वाफवून घ्यावेत.

चॉकलेट मोदक

खवा, खोबरे, दाणे बारीक करून मळून त्याला मोदकाचा आकार द्यावा. एकेका मोदकाला हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून थंड करून फ्रीजमध्ये ठेवा आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत चॉकलेट मोदकांनी करा.

पोह्यांचे मोदक

पोहे चांगले भिजवून त्याचा गोळा मळावा. त्यामध्ये गूळ खोबऱ्याचे किंवा आपल्या आवडीचे कोणतेही सारण भरून मंद आचेवर मोदक तळावेत.

दाण्यांचे मोदक

गूळ आणि दाणे एकत्र करून त्यात काजू, किसमिस घालावे व उकडलेला बटाटा व साबुदाण्याच्या पिठाच्या पारीमध्ये भरून तळून घ्यावे. हे असे तुमचे दाण्यांचे मोदक खायला आणि प्रसादाला तयार.

पंचखाद्याचे मोदक

पंचखाद्य म्हणजेच खारीक, खसखस, बदाम, काजू आणि साखर एकत्र करून सारण मैद्याच्या पारीत भरून डीप फ्राय करा. यात अंजीर किंवा खजुराची पेस्टही घालता येईल. हे मोदक अतिशय सुंदर लागतात आणि त्याचबरोबर पौष्टिकही असतात.


Next Story
Share it
Top
To Top