गौरी टिळेकर। पाच दिवसांच्या गणपती गौरींचे आज थाटात विसर्जन करण्यात येणार आहे. कोणतेही सण साजरे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. दरवर्षी बाप्पाच्या विसर्जनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेकडून कृत्रिम तलावांची सोय करण्यात येते. यावर्षी देखील महापौर निवासाच्या शेजारीच पर्यावरणपूरक कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.
अशी आहे सोय...
येथे लहान आकाराच्या बाप्पाच्या मूर्तींसाठी 3 ते 4 फुट खोल तलाव तर थोड्या मोठ्या आकाराच्या मूर्तींसाठी 7 ते 8 फुट खोल कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. रंगीबेरंगी फुलांची सजावट करून या कृत्रिम तलावांना एक आकर्षक असे रूप देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बाप्पाला निरोप देताना करण्यात येणाऱ्या आरतीसाठी 20 ते 25 टेबलांची सोय करण्यात आली आहे. तसेच सर्व निर्माल्य एकत्रित करण्यासाठी निर्माल्य कलशाची देखील सोय येथे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिके कडून त्या पूर्ण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी येथे लाईफ गार्डस असतील. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक सज्ज आहे. परिसरात स्वच्छता राखण्यासाठी स्वछतादूतांची एक तुकडी देखील येथे नेमण्यात आली आहे.