इंदौर | औरंगाबादजवळ आज पहाटे रेल्वे रुळावर काही वेळ आराम करत असलेल्या १६ मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला. हे सर्व मजूर मध्य प्रदेशाती असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घरी पायी चालत निघालेल्या या मजूरांवर वाटेतच काळाने वार केला. जालना येथील स्टील कंपनीचे १९ कामगार भुसावळला जाण्यासाठी रेल्वे रुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १६ जण ठार, तर काही कामगार जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे.
https://twitter.com/ChouhanShivraj/status/1258608853668823041?s=20
मी आपल्यासोबत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. मी आपल्या सर्वांना स्वगृही परत आणेन. पण, कुणीही पायी प्रवास करु नका. आम्ही आपल्याशी लवकरच संपर्क साधणार आहोत. सोशल मीडिया आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून आपणास माहिती देण्यात येईल, असेही चौहान यांनी म्हटले. तसेच, मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत, तर जखमींचा पूर्ण खर्च सरकार करणार असल्याचेही चौहान यांनी सांगितले. तसेच, एक टीम घटनास्थळी दाखल होत मजूरांवर अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था करतील आणि जखमी मजूरांची देखील सर्व काळजी घेण्यात येईल, असेही शिवराज सिंह यांनी स्पष्ट केले आहे.