नवी दिल्ली | दिल्लीमधील गाझीपूर फूल मार्केटमध्ये एका बॅगमध्ये तब्बल तीन किलो वजनाचा आयईडी बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यावेळी दिल्ली पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा यांनी ताबडतोप बॉम्ब डिफ्यूज केल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणाचा दिल्ली पोलीस तपास करत आहेत. गाझीपूर फूल बाजार येथे एक लावारीस बॅग सापडली.
गाझीपूर फूल मार्केट येथे लावारीस बॅगमध्ये अढळ्याची माहिती आज (१४ जानेवारी) सकाळी अकराच्या सुमारास मिळाली. यानंतर पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बॉम्ब शोधक, नाशक पथक आणि अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी तपास केल्यानंतर बॅगमधून आयईडी बॉम्ब असल्याचे कळाल्यानंतर मोकळ्या जागेत बॅगेला नेऊन खड्ड्यात बॉम्ब नियंत्रित स्फोट घडवून आणला, असे दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्ताना यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
पोलिसांच्या स्पेशल सेलने आयईडी बॉम्ब प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही बॅग स्कूटीवर ठेवली होती. यानंतर स्थानिक दुकादारांनी पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलीस आणि शोध पथ घटनास्थळी दाखल झाले. या बॅगमध्ये तीन किलो आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेट आढळून आले. जवळपास तीन किलो वजनाचा हा बॉम्ब असल्याचे म्हटले जाते. या घटनेमागे नेमकी कोणती दहशतवादी संघटनेचा हात हे अद्याप कळाले नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.