आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मेळघाटात 'मिशन ट्वेंटीएट'

आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मेळघाटात मिशन ट्वेंटीएट

अमरावती । मेळघाटात मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी गरोदर महिलांना प्रसूतीपूर्व व नंतर असे एकूण 28 दिवस मार्गदर्शन व आवश्यक उपचार मिळवून देणारी मोहीम जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेने हाती घेतली आहे. त्याअंतर्गत आशासेविका व अंगणवाडीसेविकांच्या संयुक्त पथकाकडून गरोदर मातांशी संपर्क साधून प्रकृतीची माहिती मिळवून उपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांच्या आदेशानुसार व मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले. 'मेळघाट मिशन 28' अंतर्गत आशासेविका व अंगणवाडी सेविका माता व बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे, प्रसूती सुरक्षित व्हावी आदींसाठी आवश्यक माहिती संकलन, उपचारासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

आरोग्य सेविका,आशा सेविका व अंगणवाडी सेविका असे 'ट्रिपल ए' मनुष्यबळ आरोग्य सेवेचा पाया मानला जातो. ‍या महिला कर्मचारी मेळघाटात घरोघर जाऊन मातेस प्रसुतीअगोदर व नंतर एकूण 28 दिवस आधी ट्रॅकिंग करणार आहेत. त्यात आरोग्याबाबत विविध प्रपत्रे भरून घेण्यात येणार आहेत.

धारणी व चिखलदरा तालुका मिळून सुमारे सव्वातीन लाख लोकसंख्या असलेल्या मेळघाटात माता नोंदणीची आकडेवारी साधारणत: साडेसहा हजार आहे. गरोदर माता, स्तनदा माता व नवजात बालकांना भेटून आवश्यक माहिती संकलन आशा व अंगणवाडी सेविका करणार आहेत.

आरोग्य उपचाराच्या दृष्टीने प्रसुतीची अपेक्षित तारीख, खेप, हिमोग्लोबिनची मात्रा, इतर लक्षणे, आजार, काही धोक्याची लक्षणे आहेत किंवा कसे, आदी बाबींची तपासणी व विचारणा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, बालकाची तपासणीही करून माहिती संकलन करण्यात येणार आहे. या तपासणीमुळे माता व बालकांतील धोका व जोखीम ओळखण्यास मदत होऊन गतीने उपचार मिळवून देणे शक्य होईल. मेळघाटात दोन्ही तालुक्यांत ४७८ अंगणवाडी सेविका व ३९७ आशासेविका कार्यरत आहेत, असे श्री. डॉ. रणमले यांनी सांगितले.


Next Story
Share it
Top
To Top