पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज (१७ जानेवारी) पुणे मेट्रोने प्रवास केला. फुगेवाडी स्थानक ते पिंपरीतील संत तुकाराम नगरपर्यंत त्यांनी उभ्याने प्रवास केला. यावेळी शरद पवार यांनी मेट्रोची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. तर त्यांनी अचानक केलेल्या या प्रवासावरून भाजपने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
स्थानिक नेते व प्रतिनिधी सोडून शरद पवारांनी पुणे मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे. पाटील म्हणाले, "पवार यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहेच, मात्र अशा प्रकारे घाईघाईने मेट्रोची ट्रायल करण्यामागे काय कारण आहे. पुण्याचे एवढे आमदार, खासदार, महापौर आहेत, पण यांपैकी कुणीही तिथे उपस्थित नव्हतं. तसेच शरद पवारच मेट्रोची ट्रायल घेण्यासाठी कसे काय जातात, यातून श्रेयवादाची लढाई सुरु आहे का?", असा सवालही त्यांनी केला आहे.
आयत्या पिठावर रेघोट्या
पाटील पुढे म्हणाले, "पुण्यात वेगवेगळ्या पक्षांचे आमदार, खासदार आहेत. त्यांना न कळवताच शरद पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल केली गेली. हे जे चाललं आहे ना ते आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे काम सामान्य जनतेला कळत नाही का? तुमच्याकडे १० वर्ष केंद्रात राज्य होतं तसंच १५ वर्ष महाराष्ट्रात राज्य होतं. तर तेव्हा तुम्ही मेट्रोचं काम का नाही पूर्ण केलं?" अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच मेट्रोच्या या ११ हजार कोटींच्या प्रकल्पामध्ये ८ हजार कोटी केंद्राने दिले आहेत, असेही पाटलांनी सांगितले.
मेट्रोच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्व प्रकारच्या परवानग्या मिळवल्या आणि त्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे मी सगळ्या आमदारांना आवाहन करतो की त्यांनी मेट्रोच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करा. मी तर दाखल करणारच आहे, पण सर्व आमदारांनी पण करावा. कारण ही आपल्या हक्कांवर गदा आहे. तुम्ही ट्रायल घेता काशी? जर तुम्ही म्हणत असाल ही प्रशासकीय ट्रायल आहे तर मग पवारसाहेब कशाला पाहिजेत?, असा सवाल त्यांनी केला आहे.