"गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं"-छगन भुजबळ

गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं-छगन भुजबळ

मुंबई | मोदी सरकार गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी २ ग्रॅम, ५ ग्रॅम ड्रग्जची जास्त चर्चा करत महाराष्ट्राची बदनामी करत आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय. तसेच या प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळालाय, तर त्याला पकडणारा अधिकारी कायद्याविरोधात काम केल्यानं कोर्टकचेऱ्या करत आहे, असं म्हणत भुजबळांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. ते पुण्यात टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

"तपास यंत्रणा भाजप विरोधी सरकारं जिथं आहेत तिथं तिथं अतिरेक करत आहेत"

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एनसीबीच्या महाराष्ट्रातील कारवायांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. छगन भुजबळ म्हणाले, “गुजरातमधील मुंद्रा बंदरावर ३० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. ते कुणी आणले, कुठून आणले, का आणले याची काही चौकशी नाही. दुसरीकडे २ ग्रॅम सापडले, ५ ग्रॅम सापडले असं करत सर्वांचं लक्ष ३० हजार कोटीच्या ड्रग्जवरून हटवून महाराष्ट्रावर आणलं जात आहे. न्यायालयानं हे सर्व ऐकून निर्णय दिलाय. आता आर्यन खानला जामीन मिळाला आणि पकडणारा अधिकारी कायद्याविरोधी काम केल्यानं कोर्टकचेऱ्या करत आहे.”“मागील १५ दिवसांच्या गोष्टी पाहिल्या तर भारत सरकारच्या तपास यंत्रणा ज्या पद्धतीने भाजप विरोधी सरकारं जिथं आहेत तिथं तिथं अतिरेक करत आहेत. त्यामुळेच या सर्व गोष्टी बाहेर यायला लागल्या आहेत. केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी चुकीचं काम करत आहेत आणि जनतेला त्रास देत आहेत हे समोर येतंय." असं ते म्हणाले.

"समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत हे सिद्ध झालंय. त्यांचे निकाहनामे बाहेर आलेत. नवाब मलिकही मुस्लीम आहेत. या प्रकरणात हिंदू मुस्लीम असण्याचा काहीही संबंध नाही. भाजप सरकार महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर करत आहे. लोकांना त्रास देत आहे. हे सर्व उघड करण्याचं काम नवाब मलिक यांनी केलंय,” असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.


Next Story
Share it
Top
To Top