मुंबई | बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरून आजही राजकारण होताना पाहायला मिळतं. खरं तर या दोघांच्याही मृत्यूला आता जवळपास दोन वर्षे पूर्ण होतील, पण तरीही त्यांच्या मृत्यूविषयी अनेक प्रश्न आजही उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन-तीन दिवसांआधी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी पुन्हा प्रश्न उपस्थित केले होते. तर आज (२२ फेब्रुवारी) नारायण राणेंचे पुत्र व भाजप आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
नारायण राणेंनंतर आता नितेश राणे यांनीही या प्रकरणावर भाष्य करत खळबळजनक दावे केले आहेत. नितेश राणेंनी आज सकाळ सकाळी ट्विट केले आहेत. पण या ट्विटमध्ये त्यांनी दिशा सालियान मृत्यूचा संबंध निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याशी जोडत मोठी खळबळ उडवून दिली आहे. दिशाला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आले ती कार सचिन वाझेची आहे का?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच ८ जून २०२० रोजी दिशाचा मृत्यू झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ जून रोजी वाझे पोलीस दलात परत रुजू झाला. यामध्ये काय कनेक्शन आहे?, असाही सवाल त्यांनी यावेळी केला आहे.
मालवणी पोलीस ठाण्याची भूमिका संशयास्पद – नितेश राणे
याशिवाय मालवणी पोलीस ठाण्यात तटस्थपणे तपास झाला नाही आणि म्हणूनच हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. मात्र, त्याच मालवणी पोलीस ठाण्याला आता राज्य महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे, हे कितपत योग्य आहे?. तसेच मालवणी पोलीस ठाण्याची भूमिकाही आधीपासूनच संशयास्पद आहे, असंही त्यांनी म्हंटलं आहे. शिवाय दिशा सालियनसोबत राहणारा आणि ८ तारखेच्या रात्री तिच्यासोबत असलेला रोहित राय हा पुढे येऊन का बोलत नाही? असे प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटमधून विचारले आहेत.
दिशाच्या आईवडिलांची प्रतिक्रिया
दरम्यान, याआधी नितेश राणेंचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर गंभीर आरोप केले होते. दिशाने आत्महत्या नाही, तर तिचा बलात्कार केला गेला आणि मग तिची हत्या करण्यात आली, असा आरोप नारायण राणेंनी केला होता. त्यानंतर आज नितेश राणेंचं ट्विट, त्यामुळे हे सर्व पाहता हे प्रकरण अजून किती लांबणार असाच प्रश्न पडतो आहे. मात्र, यावर आता दिशाच्या आईवडिलांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.