नोकरी मागणारे नको, उद्योजग बनून नोकरी देणारे व्हा; उद्योगमंत्री सुभाष देसाईंचे तरुणांना आवाहन

नोकरी मागणारे नको, उद्योजग बनून नोकरी देणारे व्हा; उद्योगमंत्री सुभाष देसाईंचे तरुणांना आवाहन

मुंबई | शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. मराठी तरुणांनी नोकरी बरोबरच उद्योग क्षेत्रातही नावलौकिक मिळवावा यासाठी बाळासाहेब नेहमीच आग्रही होते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेअंतर्गत ५ वर्षात सुमारे १ लाख उद्योजक तयार करून त्यांच्या माध्यमातून १० लाख तरुणांना रोजगार देण्याचे उद्योग संचानलयाचे उद्दिष्ट आहे, असे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले.

ह्या उपक्रमासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी युवासेना प्रमुख, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही विशेष प्रयत्न करीत आहेत. तरुणांनी या संधीा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. शिवसेना विभाग क्र. १ व महायुवा App च्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सुभाष देसाई बोलत होते.

नामांकित मराठी उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर ह्यांनी ज्याप्रमाणे नांगराच्या लाकडी फाळाच्या व्यापारापासून सुरुवात करुन जगप्रसिद्ध किर्लोस्कर इंजिन बनविण्यापर्यंत मजल मारली त्यांचाच आदर्श घेऊन आजच्या तरुणांनी सचोटी व मेहनतीने उद्योगात यशस्वी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्र शासन अशा तरुण उद्योजकांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत अनुदान व बॅंकांद्वारे पतपुरवठा करण्यासाठी खंबीरपणे उभे राहिल अशी ग्वाही सुभाष देसाई यांनी दिली.

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार, शिवसेना विभागप्रमुख श्री. विलास पोतनीस यांच्या संकल्पनेतून पदवीधर तरुण व महाराष्ट्र शासन ह्याच्यात दुवा साधणाऱ्या महायुवा App चा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. ह्या संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या पदवीधर युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ह्या पदवीधरांना स्वयंरोजगारा संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी CII ह्या संस्थेच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ह्या कार्यशाळेचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात संपन्न झाला.

कार्यक्रामास विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुुर्वे, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, सिनेट सदस्य मिलिंद साटम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन CII MCC चे दयाळ कांगणे यांनी केले.


Next Story
Share it
Top
To Top