खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ- ईडीकडून पुढची कारवाई

खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ- ईडीकडून पुढची कारवाई

यवतमाळ – अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) वाशिम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांभोवतीचा फार्स आणखीन घट्ट झाला आहे. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांना ईडीने अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली आहे. पण खान यांच्या वकीलांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर १०० कोटींच्या घोटाळयाचा आरोप

ईडीने ३० ऑगस्ट रोजी वाशिम जिल्हय़ातील रिसोड व इतर ठिकाणच्या गवळी यांच्या संस्थांमध्ये झडती घेतली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर १०० कोटींच्या घोटाळयाचा आरोप केला आहे. या धाड सत्रानंतर गवळी यांच्या दोन निकटवर्तीय सहकाऱ्यांना ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आलेली. ईडीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशीसंबंधित दोन व्यक्तींना समन्स पाठवले होते. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले होते. ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर दोघांनाही हजर रहावे, असे या समन्समध्ये म्हटले होते. पण या दोन्ही व्यक्तींनी खासगी कारण देत आपल्याला ईडीसमोर हजर राहण्यासाठी १५ दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी ६ सप्टेंबर रोजी केली होती.

सईद खान यांना अटक केल्यानंतर ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांचे वकील इंद्रापल सिंह यांनी केला आहे. ईडीकडून देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे खान हे पालन करण्याबरोबरच तपासात सहकार्य करत असतानाही ही अटक करण्यात आल्याबद्दल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अटकेमुळे गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. खान यांना ज्या कंपनीच्या चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. त्याच कंपनीमध्ये गवळी या निर्देशक म्हणजेच डायरेक्टर होत्या. त्यामुळे आगामी काळामध्ये गवळी यांची या प्रकरणामध्ये चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गवळी यांच्यासंदर्भातील मागील काही दिवसांमध्ये हे दुसरे प्रकरण आहे, ज्यामध्ये ईडीने कारवाई केली आहे.


Next Story
Share it
Top
To Top