बीड । शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी आज बीडच्या हिंगणगावमध्ये जाऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. गेल्या 3 दिवसांपूर्वी नामदेव जाधव या शेतकऱ्याने ऊस जात नसल्याने आत्महत्या केली होती.
यावेळी सदाभाऊ खोतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, "कोरोनाच्या अडीच वर्षानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री मास्क काढून, आपला चेहरा दाखवणार आहेत. मुख्यमंत्री आज (१४ मे) सभा घेऊन मास्क काढून, जसा चंद्र आपला मुखडा दाखवतो, तसा आपला मुखडा जनतेला दाखवणार आहेत. लोककल्याणकारी राज्य त्यांना निर्माण करता आलं नाही. हे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे. अशी टीका देखील खोत यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आता इंडियाच्या बाहेर येऊन भारतात यावं आणि जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत. सध्या जे शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याला फक्त सरकार जबाबदार असल्याचं यावेळी खोत म्हणाले आहेत.