स्वत:च्या मुलाला मंत्री केलं,आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय? भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सवाल

स्वत:च्या मुलाला मंत्री केलं,आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय? भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई। महाविकास आघाडी सरकार आणि राज्यातील विरोधी पक्ष या दोघांमध्ये सातत्याने वेगवेगळ्या कारणावरून आरोप-प्रत्यारोप झालेले उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. आणि आता देखील तसंच काहीसं झालंय. भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोरगरीबांच्या मुलांचं काहीच पडलेलं नाही. त्यांना फक्त आपल्याच मुलाची काळजी आहे. त्यांनी आपल्या मुलाला मंत्री केलं. आमच्या गरिबांच्या लेकराचं काय?, असा सवाल करत भाजप नेते, आमदार राम सातपुते यांनी राज्यातील आघाडी सरकारचे मुख्यमंत्री यांच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका करण्यात आली.

तरुणांच्या पिढ्या बरबाद करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला

राज्यातील ठाकरे सरकारला गोरगरीब मुलांचं काहीही पडलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला मंत्री केलं. पण गोरगरिबांच्या मुलांच्या नोकरीची काळजी त्यांना नाही. गोरगरिबांच्या चुलीत पाणी टाकायचं ही राज्य सरकारची भूमिका आहे, अशी गंभीर टीका आता भाजप नेते आमदार राम सातपुते यांनी केलिये. पुढे बोलताना सातपुते म्हणाले तरुणांच्या पिढ्या बरबाद करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे. या पेपरफुटी प्रकरणातील दलाल हे सरकारचे दलाल आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचं निलंबन केलं पाहिजे. चौकशी केली पाहिजे. भरतीमध्येही वाझे वसुली करणार हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. चांगलं केलं की आम्ही केलं. वाईट झालं की केंद्रान केलं. असं म्हणत संपूर्ण ठाकरे सरकारवरच टीकेचे आसूड ओढले आहेत.

अशा प्रस्थापितांचा मी जाहीर धिक्कार करतो

भाजप आमदार राम सातपुते यांच्याबरोबरच दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या राज्यातील विकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण सगळेजण कोरोनाचा सामना करतोय, अशातच जनजीवन संपूर्ण विस्कळीत झालेले असतांना कोरोना काळात लांबलेल्या परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचं वय वाढलं, त्यावर सरकारने वयोमर्यादा वाढविण्याची फक्त घोषणाच केली, प्रत्यक्षात मात्र कुठलीही अंमलबजावणी न करता बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला या प्रस्थापितांनी फक्त पानं पुसली असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ते आरोग्य विभागातील पदभरतीत गोंधळ घालणाऱ्या सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रति नियत साफ नाही. त्यांच्या हेतूवरच आता विद्यार्थी शंका निर्माण करतायेत. अशा प्रस्थापितांचा मी जाहीर धिक्कार करतो, अशी जहरी टीका आता गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर केली आहे.


Next Story
Share it
Top
To Top