शरद पवारांच्या भेटीनंतर गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चेला उधाण

शरद पवारांच्या भेटीनंतर गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चेला उधाण

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच 'सिल्वर ओक' या बंगल्यावर काल (शुक्रवार, ८ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पवारांच्या घराच्या दिशेने धावत येत चप्पल व दगडफेक केली. या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर आता राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. अशातच आज (शनिवार, ९ एप्रिल) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली घेतली. त्यानंतर गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले.


गृहमंत्र्यांनी आधी शरद पवारांची भेट घेतली आणि लगेचच ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रवाना झाले. खरंतर शरद पवारांनी तातडीने वळसे पाटलांना बैठकीसाठी बोलावलं होतं. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली असल्यामुळे या भेटीकडे सर्वांचंच लक्ष वेधलं गेलंय. शरद पवारांनी गृहमंत्र्यांना इतक्या तातडीने बोलावून घेतल्यामुळे वळसे पाटलांची गृहमंत्री पदावरून उचलबांगडी होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तर शरद पवारांच्या भेटीनंतर वळसे पाटील त्वरित मुख्यमंत्र्यांच्या भेटीलाही गेले. उद्धव ठाकरे आणि वळसे पाटील यांच्यात बैठक सुरू असून यावेळी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील उपस्थित आहेत.


दरम्यान, मध्यंतरी मुख्यमंत्री ठाकरे हे गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीमधील नेत्यांवर, मंत्र्यांवर कारवाई करत आहेत. मात्र, यादरम्यान राज्यातील तपास यंत्रणा शिथिल होत्या. राज्यातील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप आधीपासूनच करण्यात येत आहे. त्याचबरोबर नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राइव्ह बॉम्ब टाकला. या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी लवकरच तपास करू असे म्हणत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, तरी देखील कोणती कारवाई झाली नाही. अशातच शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे यात पोलिसांचे अपयश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांची उचलबांगडी होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


Next Story
Share it
Top
To Top