मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनारुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून या तिसऱ्या लाटेमध्ये अनेक राजकीय नेते मंडळी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आता भारताची गानकोकीळा अशी ओळख असणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. लता मंगेशकर यांचं वय ९२ वर्षे असल्यामुळे आणि इतर काही आरोग्य विषयक समस्यांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
लता मंगेशकरांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र, त्यांचं वय पाहता त्यांना घरीच क्वारंटाईन करणं शक्य नसल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लता दीदींची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे. पेडणेकरांनी दिलेल्या माहितीनुसार, लता दिदींना कोविड न्युमोनिया झाला असून ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
दरम्यान, लता दिदींच्या प्रकृतीविषयी समजताच त्या लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी देशभरातून प्रार्थना होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या चाहत्यांनीही सोशल मिडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर राजकीय नेत्यांनी देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांना लवकर आराम वाटावा, अशी मी प्रार्थना करतो !", अशी प्रतिक्रिया ट्वीटरद्वारे दिली आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही लता मंगेशकरांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले, "आदरणीय लता दिदी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. आपल्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, या सदिच्छा. काळजी घ्या!", असे ते म्हणाले.
तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील दिदींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी आई अंबाबाईकडे प्रार्थना केली आहे.
यासह देशभरातील अनेक राज्यातील नेत्यांनी दिदींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.