पुणे | राज्यातील कोरोना संख्या आटोक्यात आल्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्राला निर्बंध मुक्त म्हणून घोषित केले. राज्यातील सर्व निर्बंध उठताच गुढीपाडव्याचा सण आल्यामुळे मनसेने आपल्या गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन केले. लॉकडाउननंतर म्हणजेच दोन वर्षांनी मनसेने मेळाव्याचे आयोजन केलं होतं. त्यामुळे या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, या कार्यक्रमात राज ठाकरेंनी केलेल्या भाषणामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. त्याचबरोबर याचे परिणाम त्यांना स्वतःच्या पक्षातही जाणवू लागले आहेत.
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात केलेल्या विधानानंतर पुण्यासोबतच इतर ठिकाणी सुद्धा स्वपक्षातच नाराजीचा सूर उमटू लागला. राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज यांच्या भूमिकेवर विरोधकांनी सुद्धा यांच्यावर सडकून टीका केली. मात्र, विरोधकांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी मंगळवार, १२ एप्रिल रोजी सुद्धा पुन्हा एकदा 'उत्तर'सभा घेत विरोधकांना सुनावलं. तसेच मशिदीवरील भोंग्यांसाठी अल्टीमेटम देखील दिला. त्यामुळे मनसैनिक नाराज झाल्याचं पाहायला मिळत असून पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे.
मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला ३ मेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. पण त्याआधीच मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरवात केली आहे. मुंबईसह मराठवाड्यातील मनसेतील ३५ नाराज मुस्लिम मनसैनिकांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी राज ठाकरेंना पत्र देखील लिहिलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज खान यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर याआधी पुण्यातील वसंत मोरे यांनी देखील राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता. त्यानंतर त्यांना पदावरून हटविण्यात आले. तर आताही मनसेच्या ३५ मनसैनिकांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे.